गडचिरोली, ता. ३० : आपल्या काकासोबत निकाल घेण्यासाठी शाळेकडे निघालेल्या सोनाली मिस्त्री या चिमुकलीचा ट्रॅक्टरच्या धडकेत करुण अंत झाला. अतिशय आनंदाने आपले निकालपत्र बघण्याची उत्सूकता असलेल्या सोनालीचा असा करुण अंत अनेकांच्या मनाचा चटका लावून गेला आहे.
प्राप्त माहितीनुसार इयत्ता दुसरीत शिकणारी सोनाली आपल्या काकासोबत निकालपत्र आणण्यासाठी शाळेत जाण्यासाठी निघाली होती. मात्र शाळेत पोहोचण्यापूर्वी वाटेतच अपघातात तिचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना ३० एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. मृत सोनाली चंद्रपूर जिह्यातील तारसा येथील कारमेल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दुसऱ्या वर्गात शिकत होती. मंगळवारी शाळेत निकाल असल्याने ती निकालपत्र घेण्यासाठी एमएच ३३- एजी १३५८ या क्रमांकाच्या स्कूटीने तिचे काका अमूल्य मिस्त्री यांच्यासोबत सुभाषग्राम येथून निघाली. मात्र आनंदग्राम ते अडपल्ली दरम्यान त्यांच्या स्कूटीला अडपल्लीकडून सुभाषग्रामकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३३ व्ही ६१३७ ने जबर धडक दिली. यात स्कूटीच्या मागे बसून असलेल्या सोनालीला जबर मार बसला व तिचा जागीच मृत्यू झाला. तिचे काका अमूल्य मिस्त्री हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व सोनालीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे सोनालीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शाळेत ही बातमी मिळताच सर्व शिक्षक व वर्गमित्रांमध्ये शोककळा पसरली. सोनाली ही वर्गात हुशार विद्यार्थिनी असल्याने तिच्या निकालाच्या दिवशी अशा अकाली मृत्यूने सारेच हळहळले आहेत. या घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.









