प्रचाराच्या दगदगीमुळे मंत्री धर्मराव बाबा आत्राम आजारी

107

गडचिरोली, ता. ७ : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा पाठ व कंबरदुखीचा त्रास झाल्याने त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. डॅाक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून विश्रांती न घेतल्यास त्यांच्यावर शस्रक्रिया करावी लागू शकते, असेही सांगितले आहे.

मंत्री आत्राम यांना पाठ व कंबरदुखीचा आजार काही महिन्यांपासून सुरू होता, मात्र त्यांनी या दुखापतीकडे दुर्लक्ष करून लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले होते. कंबरेला पट्टा बांधून ते संपूर्ण लोकसभा क्षेत्रात प्रचारासाठी फिरले, तब्येतीकडे त्यांचे झालेले दुर्लक्षच आता त्यांच्या दुखापतीसाठी कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे डॅाक्टरांनी आता त्यांना विश्रांती घेण्यासाठी सांगीतले आहे. सोमवार (ता. ६) ते मुंबईहून गडचिरोलीला परत येणार होते मात्र त्यांना प्रवास करण्यासाठीसुद्धा डॅाक्टरांनी मनाई केल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी विश्रांती घेतल्यास ते लवकर बरे होतील असेही डॅाक्टरांनी म्हटले आहे.