पोलिसांनी उद्ध्वस्त केले माओवाद्यांचे मनसूबे

127

गडचिरोली, ता. ६ : माओवाद्यांनी जमिनीत स्फोटके पुरून पोलिसांचा घातपात करण्याचा कुटील डाव रचला होता. पण गडचिरोली पोलिसांनी तत्परता दाखवत मोठ्या सफाईने ही स्फोटके हुडकून काढून माओवाद्यांचे मनसूबे उद्ध्वस्त केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ दरम्यान आय.ई.डी. हल्ले करण्याच्या योजनेत माओवाद्यांनी टिपागड परिसरात काही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स जमिनीत पुरून ठेवल्याची विश्वासार्ह माहिती प्राप्त झाल्याने पोलिसांनी या भागात शोध अभियान राबविले आणि सुरक्षा दलांची जोरदार तैनाती करण्यात आली होती. त्यामुळे माओवाद्यांना त्या वेळी या क्लेमोअर्स / स्फोटकांचा वापर करणे अशक्य होते. खात्रीशीर मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवार (ता. ५) टिपागड परिसरात एक निश्चित अचूक ठिकाण उघडकीस आले जिथे डोंगरावर ही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स पुरून ठेवण्यात आले होते. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात तातडीने २ बी.डी.डी.एस. (बाॅम्ब शोधक व नाशक) च्या पथकासह सी – ६० चे एक पथक आणि सी.आर.पी.एफचे एक क्यू.ए.टी पथक डंप शोध मोहिम राबविण्यासाठी आणि गरज पडल्यास तो नष्ट करण्यासाठी तैनात करण्यात आला. सोमवार (ता.६) सकाळी जेव्हा पथके घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांना स्फोटके आणि डिटोनेटरने भरलेले ६ प्रेशर कुकर आणि स्फोटकांनी आणि गंजलेले लोखंडी तुकडे भरलेले ३ क्लेमोर पाईप्सदेखील सापडले. उर्वरित ३ क्लेमोर पाईप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते. पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गन पावडर, औषधे आणि ब्लँकेट सापडले. एकुण ९ आय.ई.डी. आणि ३ क्लेमोर पाईप्स बी.डी.डी.एस. पथकाच्या साहाय्याने घटनास्थळी नष्ट करण्यात आले. तसेच घटनास्थळी असलेले उर्वरित साहित्य जागीच जळून खाक झाले आहे. पोलिस मदत केंद्रामध्ये आल्यानंतर गुन्हा नोदविण्याची तजवीज ठेवली आहे. ही स्फोटके जप्त केल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे.