अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अतिरीक्त जिल्हा शल्यचििकत्सकांनी केले रक्तदान

136

ग्लोबल गडचिरोली न्यूज ,

गडचिरोली, ता. २० : उन्हाळ्याच्या तिव्रतेत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असल्याने अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सतीशकुमार सोळंके यांनी पुढाकार घेत जिल्हा सामान्य रुग्णालयात २० मे २०२२४ रोजी रक्तदान शिबिर घेतले. या शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालायच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॅ. सतीशकुमार सोळंके यांनीही स्वेच्छेने रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली.

मागील काही वर्षांत रक्तदानासंदर्भात जनजागृती होऊन अनेक नागरिक रक्तदान करत असले, तरी अनेकदा रुग्णालयात पुरेसा रक्तसाठा नसतो. विशेषत: उन्हाळ्यात रक्तदान शिबिरे क्वचितच होत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवतो. हा रक्ताचा तुटवडा एखाद्याच्या जीवावरही बेतू शकतो. ही बाब लक्षात घेत अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सतीशकुमार सोळंके यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातच रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे ठरविले. विशेष म्हणजे या शिबिरात रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सोळंके यांनीही स्वत: रक्तदान केले. तसेच डाॅ. मनिष मेश्राम, डाॅ. सुमित मंथलवार, डाॅ. रोकडे यांच्यासह २५ हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत मुबलक रक्तसाठा असावा यासाठी प्रयत्न सुरू असून २१ मे २०२४ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करत सहकार्य करावे, असे आवाहन अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सतीशकुमार सोळंके यांनी केले आहे.