संपत्तीच्या हव्यासातून तिने सासऱ्यालाच संपवले

161

नगररचनाकार पदावर कार्यरत सुनेने दिली हत्येची सुपारी

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ८: पैशांचा लोभ माणसाचे राक्षसात

कधी रूपांतर करेल हे सांगताच येत नाही. अशीच घटना नागपूर येथे घडली असली,तरी या घटनेचे थेट कनेक्शन गडचिरोली जिल्ह्याशी आहे. नागपूर येथील वडीलोपार्जित सुमारे ३०० कोटींच्या संपत्तीच्या वादातून स्वतः च्या सासऱ्याची कट रचून हत्या केल्या प्रकरणी गडचिरोली येथील नगररचनाकार अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) हिच्यासह इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. संपत्तीसाठी आपल्याच पतीच्या पित्याची निर्घृण हत्या करणारी ही उच्च शिक्षित सून सध्या पोलिस कोठडीत आहे.

नागपूर येथील शुभमनगर परिसरात राहणारे पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा २२ मे रोजी मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यांची सुमारे ३०० कोटींची वडिलोपार्जित संपत्ती असून त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ. मनीष, सून अर्चना पुट्टेवार व मुलगी आहे. दरम्यान पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या पत्नी शकुंतला यांची शस्त्रक्रिया झाल्याने ते पत्नीला बघून दवाखान्यातून मुलीच्या घरी जात होते. याच दरम्यान कारच्या धडकेत पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या चुलत भावाला संशय आल्याने त्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली व तपासाला वेग आला. तपासाअंती त्यांच्या घरातील कारचालक सार्थक बागडे याची भूमिका संशयास्पद आढळल्याने त्याची कसून चौकशी करत पोलिसांनी सचिन धार्मिक व नीरज निमजे उर्फ नायटी यालाही ताब्यात घेतले. त्यांनी सगळी हकीगत सांगितल्यावर पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे या प्रकरणात आरापौंनी दिलेल्या बयाणानुसार पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सुन व डॉ. मनीष यांची पत्नी अर्चना पुट्टेवार यांनी चालकाला पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी अर्चना पुट्टेवार हिला अटक केली आहे. अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) गडचिरोली येथे नगररचना सहायक संचालक म्हणून कार्यरत आहे. तिच्या सासन्याच्या वडिलोपार्जित सुमारे ३०० कोटींची संपत्ती असल्याने अर्चना पोर्लेवारला कोणत्याही परीस्थितीत ही संपत्ती हडप करायची होती. या मालमत्तेच्या मोहात तिने सासऱ्याच्या हत्येसाठी सुपारी देऊन हत्या केली.