स्पार्क अभ्यासक्रम व्यक्तित्व समृद्ध करण्यासह व्यसनमुक्ती शिकवणारा : कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

102
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  • गडचिरोली, ता. ११ : स्पार्क अभ्यासक्रम वर्गखोलीतील हे शिक्षण नसून प्रत्यक्ष गावात जाऊन शिक्षण मिळते. व्यक्तित्व समृद्ध करण्यासह दारू व तंबाखूच्या व्यसनाला कमी कसे करता येईल, हे शिकवणारा हा अभ्यासक्रम आहे, असे प्रतिपादन करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
  • स्पार्क अभ्यासक्रमाअंतर्गत गोंडवाना विद्यापीठ येथे एकदिवसीय कार्यशाळा मंगळवार (ता. ११) पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मोहन हिराबाई हिरालाल, मॉडेल कॉलेजचे चंद्रमौली, सर्चचे सहसंचालक तुषार खोरगडे, मुक्तिपथचे प्रभारी संचालक संतोष सावळकर आदी उपस्थित होते. ग्रामीण समाजात व्यसनाविरुद्ध सामाजिक कार्यक्रम स्पार्क हा अभ्यासक्रम मॉडेल डिग्री कॉलेज गोंडवाना विद्यापीठ, सर्च यांच्या समन्वयातून मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. प्रती बॅच १३ विद्यार्थी प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. या अभ्यासक्रमाअंतर्गत गोंडवाना विद्यापीठात पेसा व वनहक्क कायद्याची उपयुक्तता तसेच मीडियाचे महत्त्व या विषयावर स्पार्क विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेसा कायदा काय आहे, महत्व, गावाच्या दारूविक्री बंदीसाठी गावाच्या निर्णयाची ताकद, पेसा कायद्यातून स्वयंशासन आदीबाबत मार्गदर्शन करत वृक्षमित्र संस्थेचे संस्थापक मोहन हिराबाई हिरालाल यांनी विद्यार्थ्यांशी प्रशनोत्तरांद्वारे संवाद साधला. दुपारच्या सत्रात सामाजिक कामात मिडियाचे काय महत्व आहे. घटनेची किंवा कार्यक्रमाची बातमी कशी लिहावी. सोशल मीडियाचा वापर कसा करावा, या मुद्द्यावर पत्रकार मिलिंद उमरे यांनी मार्गदर्शन केले. संचालन माॅडल काॅलेजचे भारत घेर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सर्चचे तुषार खोरगडे यांनी मानले. सप्टेंबर २०२४ पासून स्पार्क अभ्यासक्रमाची नवीन बॅच सुरू होणार आहे. या विषयात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून प्रवेश घ्यावा. मॉडेल डिग्री कॉलेज गोंडवाना विद्यापीठ किंवा सर्च येथे संपर्क साधावा असे आवाहन मॉडेल डिग्री कॉलेजचे चंद्रमौली यांनी केले.
  • ————————————–