अतिदुर्गम भागातील महिला शेतकरी निघाल्या कृषीदर्शन सहलीला

101

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १३ : जिल्ह्रातील महिला शेतक­ऱ्यांनी राज्यभरात फिरून नवे कृषी तंत्रज्ञान बघावे, शिकावे व त्यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील ४० शेतकऱ्यांसाठी आयोजित १३व्या कृषीदर्शन सहलीकरीता शेतकरी रवाना झाले.

एटापल्ली, कोटमी, पिपली बुर्गी, गट्टा (जां.), आलदंडी, वांगेतुरी, भामरागड, धोडराज, कोठी, नारगुंडा, ताडगाव, मन्नेराजाराम पोलिस स्टेशन, कसनसूर, लाहेरी उप पोलिस स्टेशन, हालेवारा, बोलेपल्ली, हेडरी, बुर्गी (ये.), सुरजागड व गर्देवाडा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील एकूण ४० शेतकऱ्यांकरिता गडचिरोली पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट उडानअंतर्गत १३व्या कृषीदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. यापुर्वी झालेल्या एकुण १२ कृषी दर्शन सहल व अभ्यास दौ­ऱ्यांमध्ये दुर्गम भागांतील विविध उपविभागातून एकूण ५१० महिला व पुरुष शेतक­ऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या १३व्या सहलीमध्ये एटापल्ली, भामरागड व हेडरी उपविभागातील पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र हद्दीतील अतिदुर्गम भागातील ४० शेतक­ऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या सहली दरम्यान सहभागी शेतकरी वरोरा, वर्धा, घातखेड, बडनेरा, अकोला, शेगाव, जळगाव, राहुरी जि. औरंगाबाद, वाशीम, येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच विविध शेती प्रक्षेत्र यांना भेटी देणार आहे. तसेच गणेशखिंड जि. पुणे येथील फळ संशोधन केंद्र व नागपूर येथील लिंबूवर्गीय संशोधन केंद्रालासुद्धा भेट देणार आहे. त्याचप्रमाणे शेतीविषयक अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान जाणून घेणार आहेत. यामुळे ते प्रगत तंत्रज्ञानाचे अनुभव आपल्या शेती व्यवसायामध्ये वापरून आपली आर्थिक उन्नती साधून जीवनमान उंचावतील. त्यामुळे जिल्ह्यातील विकासात त्यांचे योगदान असणार आहे. हा कार्यक्रम पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात १३ ते २२ जूनपर्यंत एकूण १० दिवस आयोजित करण्यात आला आहे. या १३व्या कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा कार्यक्रमास मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक धनंजय पाटील, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके व अंमलदारांनी सहकार्य केले.