- ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १: पाणस्थळांवर दिमाखात जलविहार करणारा अतिशय सुंदर दिसणारा कांस्य पंखी कमळपक्षी अचानक शहरात आला मात्र येथील कपिल सहारे यांनी या पक्ष्याची योग्य काळजी घेत त्याला तलाव परीसरात निसर्गमुक्त करून जीवदान दिले.
स्थानिक लांझेडा परीसरात राहणारे कपिल सहारे यांच्या घरी अचानक हा पक्षी आला. तो काहीसा आजारी वाटत होता. कपिल सहारे यांनी त्याला कौशल्याने पकडून तपासणी केली. एरवी नदी, जलाशयाच्या परीसरात आढळणारा हा पक्षी भरकटून शहरात आला होता. कपिल सहारे यांनी त्यांचा मुलगा बुद्धांश याच्यासह तलाव परीसरात जाऊन या पक्ष्याला निसर्गमुक्त केले. या पक्ष्याचे इंग्रजी नाव Bronze-winged Jacana, तर शास्त्रीय नाव Metopidius indicus आहे. आकार तित्तीराएवढा असून डोके, मान व छाती चमकदार काळी, पाठ व पंख कांस्यवर्णी, आखूड शेपटी बदामी-लाल रंगाची तसेच डोळ्यापासून मागे रुंद पांढरी भुवई असते. याची बोटे खूपच लांब असल्याने हा कमळाच्या पानांवर सहज चालतो. म्हणून याला कमळपक्षी म्हणतात. त्याला जीवदान दिल्याबद्दल सहारे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.









