Home मराठी ४६० स्पर्धकांची आठव्या फेरीपर्यंत चुरशीची लढत

४६० स्पर्धकांची आठव्या फेरीपर्यंत चुरशीची लढत

119

,ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३० : जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या युवकांना विविध खेळांच्या स्पर्धेच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचविता यावे, या उद्देशाने गडचिरोली पोलिस दलाच्या प्रोजेक्ट उडानअंतर्गत व अधिराज वेलफेअर फाउंडेशन, रोशन सर चेस अॅकॅडमी गडचिरोली, अप्पलवार आय हॉस्पिटल गडचिरोली व गडचिरोली जिल्हा अॅमॅच्युअर चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने ३० जून रोजी “अधिराज बुद्धीबळ चषक” एकदिवसीय जलद बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन पोलिस मुख्यालय परिसरातील पांडू आलाम सभागृहामध्ये उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी ४६० स्पर्धकांची आठव्या फेरीपर्यंत चुरशीची लढत रंगली.

या बुद्धीबळ स्पर्धेचे उद्घाटन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले. या बुद्धीबळ स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातून ४६० प्रज्ञावंत बुद्धीबळपटुंनी आपला सहभाग नोंदविला. ही स्पर्धा ही तीन वेगवेगळ्या वयोगटात आयोजित करण्यात आली होती. या खुला वर्ग, १६ वर्षे वयोगटाच्या आतील, १० वर्षे वयोगटाच्या आतील व ८ वर्षे वयोगटाच्या आतील यांचा समावेश होता. प्रत्येक गटातील स्पर्धकांचे ८ राऊंड घेण्यात आले. त्यामध्ये खुल्या गटात प्रथम-दिशांक सचिन बजाज, द्वितीय आदित्य नरेंद्र ऊईके व तृतीय-शौनक बडोले यांनी क्रमांक पटकावला असुन विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार,, १० हजार व ७ हजार रुपये रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. १५ वर्षे वयोगटाच्या आतील गटामध्ये प्रथम सहजवीर सिंग मारस, द्वितीय सार्थक मंगेश वासेकर व तृतीय क्रमांक निहान पोहाने याने पटकावला. १० वर्षे वयोगटाच्या आतील गटामध्ये प्रथम वेद निरज पौर, द्वितीय परिस कुबडे व तृतीय क्रमांक रुद्र ठावकर पटकावला. ८ वर्षे वयोगटामध्ये प्रथमकनिष्क उमेश इंदूरकर, द्वितीय-वेदांत नितीन पुजारा व तृतीय क्रमांक युग बोंडे याने क्रमांक पटकावला. यासोबतच बेस्ट सिनियर प्लेअर (५०अ) प्रथम प्रमोद धामगये व द्वितीय क्रमांक ईश्वर रामटेके, बेस्ट यंगेस्ट बॉय श्राव्यश्लोक, बेस्ट यंगेस्ट गर्ल ताश्वी धीरज जारोंडे व बेस्ट फिमेल प्लेअर प्रथम-हर्षिता कुचेरिया व द्वितीय क्रमांक अरूणा धुंदले यांनी पटकाविला. या बुद्धीबळ स्पर्धेत एकुण ६१ बक्षिसे वितरीत करण्यात आली. सर्व स्पर्धकांना सहभागीचे प्रमाणपत्र देण्यात आले. ही स्पर्धा सकाळी ८.३० वाजता सुरू होऊन सायंकाळी ६ वाजता संपली. स्पर्धेचे उद्घाटक पोलिस अधीक्षक नीलोत्पल मार्गदर्शन करताना म्हणाले की, गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्रात अशा स्तरावरील बुद्धीबळ स्पर्धेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच खेडाळू सहभागी झाले आहेत. खेडाळूंना संधी देण्याकरीता गडचिरोली पोलिस दल विविध स्पर्धा राबवत असते. त्यामध्ये आता अधिराज वेलफेअर फाउंडेशनच्या सहकार्याने बुद्धीबळ स्पर्धेला आपण सुरुवात केलेली आहे आणि येथुन पुढे या स्पर्धेचे मोठ्या स्तरावर आयोजन करण्याचा आमचा मानस आहे, असेही ते म्हणाले. यासोबतच स्पर्धकांच्या पालकांनी व स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्पर्धेकरिता आलेल्या सर्व खेडाळू व पालकांची नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या बुद्धीबळ स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणुन अप्पलवार आय हॉस्पीटलने मोलाचा वाटा उचलला. या बुद्धीबळ स्पर्धेमध्ये पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश, अपूर्वा पाठक तसेच अप्पलवार आय हॉस्पिटल येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. हेमंत अप्पलवार, डॉ. अद्वय अप्पलवार, डॉ. वृषाली अप्पलवार, डॉ. अंकिता अप्पलवार, रोशन सर अॅकॅडमीचे रोशन सहारे, आंतरराष्ट्रीय आरबिट्रेटर (मुख्य परिक्षक) प्रवीण पानतावणे. दीपक चव्हाण व त्यांची संपूर्ण टिम उपस्थित होती. या स्पर्धेसाठी सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक धनंजय पाटील, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके, पोलिस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल व अंमलदारांनी सहकार्य केले.

—————————————————————