नागपूर नागरिक सहकारी बँकेचा समाजमित्र सन्मान सोहळा

120

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १२ : नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या गडचिरोली शाखेने आपल्या ६ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून समाजमित्र सन्मान सोहळ्याचे तसेच कार लोन मेळाव्याचे आयोजन केले. नागपूर नागरिक सहकारी बँक बँकिंग व्यवसायसोबतच आपल्या सामाजिक दायित्वचा प्रत्यय देत आली आहे. ज्याद्वारे रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप आदी उपक्रम राबवत आली आहे. या ६ व्या वर्धापनदिनी सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ कार्य करणाऱ्या विभूतींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यात श्री सत्य साई सेवा संघटना गडचिरोलीतर्फे डॉ. चंद्रकांत लेनगुरे, भूषण समर्थ, आदमने, जे आध्यात्मासोबतच अनेक सेवाकार्य करीत असतात ज्यात प्रामुख्याने आठवड्यात ३ दिवस फिरता दवाखाना(मेडिकल व्हॅन सेवा), गरजूंसाठी नारायण (अन्नदान) सेवा, स्वच्छता सेवा, पर्यावरणासाठी वृक्ष लागवड व संवर्धन सेवा (प्रेमतरू सेवा) आदी अनेकविध निस्वार्थ सेवा करून खऱ्या अर्थाने परमेश्वर सेवा करतात, आधारविश्व फाउंडेशनतर्फे गीता हिंगे ज्यांनी त्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून कोरोना काळात बेवारस मृतदेहाचे अंत्यसंस्कार करून तसेच कोरोनाबधितांना स्वखर्चाने टिफिन सुविधा उपलब्ध करून दिली. त्याच बरोबर महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाच्या कार्यातही ते अग्रेसर आहेत. तसेच देवाजी तोफा ज्यांनी समस्त आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले आणि ग्रामसभेची ताकद सर्वांना दाखवून दिली. डॉ. हेमंत अप्पलवार ज्यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम ठिकाणी सर्वप्रथम नेत्ररोग सुविधा उपलब्ध करून दिली त्याच बरोबर सुरवातीच्या काळात दुर्गम भागातही आपली सेवा दिली, डॉ. शिवनाथ कुंभारे श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि तुकारामदादांच्या प्रेरणेने रुग्णसेवेतून कित्येकदा माणुसकीचा परिचय देत आले आहेत. प्रा. सविता सादमवार यांनी पणती या ग्रुपच्या माध्यमातून अदिवासी दुर्गम भागातून गडचिरोली येथे दवाखान्यात येणाऱ्या माता व शिशूंसाठी कपडे उपलब्ध करून देतात तसेच इतरही सामाजिक कार्यात त्या अग्रेसर आहेत, संजय मेश्राम, प्रसाद पवार हे ‘माणुसकीचा घास’ हा उपक्रम चालवतात. त्यामाध्यमातून जिल्हा महिला व बालरुग्णालयात रुग्णाच्या नातेवाइकांसाठी अन्नाचे पाकीट उपलब्ध करून देतात आणि सलग ५२७ दिवस हा उपक्रम चालू आहे. तानाजी भांडेकर हे शिक्षकी पेशा सांभाळून दुर्गम भागात अनेक प्रकारचे समाजकार्य करत असतात. याप्रसंगी प्रमुख पाहुणे देवाजी तोफा यांनी ग्रामसभेचे महत्त्व आणि अधिकार याबाबत माहिती दिली. तसेच अदिवासी समाजाच्या एकजुटीतून आर्थिक प्रगती कशी सध्या केली याचाही उल्लेख केला. या कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी सर्व सन्मानार्थीच्या कार्याचे कौतुक केले आणि प्रत्येकाला आपापल्या परीने सामाजिक ऋण फेडता आले पाहिजे, असे सांगितले. तसेच नागपूर नागरिक सहकारी बँक गडचिरोली शाखेने अधिकाधिक व्यवसाय करून बँकेच्या सर्व कर्जयोजना/ठेवयोजना सर्वदूर पोचवाव्या जेणे करून समाजच्या शेवटच्या घटकाना या ग्राहकाभिमुख सेवाचा लाभ घेता येईल, असे मत व्यक्त केले सर्व मान्यवर, ग्राहक हितचिंतकांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.