दोन लाखांचे बक्षिस असलेल्या जहाल माओवाद्याने पोलिसांपुढे केले आत्मसमर्पण

110

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता. २४ : जहाल माओवादी लच्चू करीया ताडो (वय ४५), पार्टी सदस्य, भामरागड दलम, रा. भटपार ता. भामरागड, जि. गडचिरोली याने बुधवार (ता. २४) गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले. शासनाने त्याच्यावर एकूण २ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. विशेष म्हणजे आतापर्यंत एकूण ६७० माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.

लच्चू करीया ताडो २०२१२-१३ पासून गावात राहुन जनमिलिशीया म्हणून माओवाद्यांसाठी राशन आणून देणे, सेंट्री ड्युटी करणे, माओवाद्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध व्यक्तींचे खून करण्याआधी रेकी करून त्याची माहिती माओवाद्यांना पुरविणे, पोलिस पार्टीबद्दल माओवाद्यांना माहिती देणे तसेच माओवाद्यांची पत्रके जनतेपर्यत पोहचविणे व इतर काम तो करत होता. २०२३ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन तो आजपर्यंत कार्यरत. या कार्यकाळात २०२२ मध्ये ईरपनार गावातील रस्ता बांधकामावरील १९ वाहनांची जाळपोळ करण्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता, २०२३ मध्ये नेलगुंडा जंगल परीसरातील पायवाट रस्त्यातील जमिनीत स्फोटके पुरून ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून लच्चू करीया ताडो याला एकूण ४.५ लाख रुपये बक्षिस जाहीर केले आहे. २०२२-२४ मध्ये आतापर्यंत एकूण २२ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल,सीआरपीएफचे कमांडंन्ट दाओ इंजिरकान किंडो यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.