ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २४: जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि धरणातील विसर्गामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच आपदग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाची बचाव पथके धावून जात आहेत.

पुरात वेढलेल्या आणि पुरामुळे आरोग्यसेवा उपलब्ध करून घेण्याकरिता रस्ता उपलब्ध नसल्याने अडचणीत सापडलेल्या विविध प्रकरणात बुधवार (ता. २४) एसडीआरएफ, पोलिस, महसूल, आरोग्य, आपदा मित्र यांचा समावेश असलेल्या बचाव पथकाच्या तत्परतेने अनेक दुर्घटना टाळण्यात यश आले. तेलंगणा राज्यातील आशिफाबाद येथील कलावती ( वय २०) ही गर्भवती महिला सिरोंचा तालुक्यातील चिक्याला येथे नातेवाईकाकडे आल्या असता रात्री अचानक त्यांना प्रसुती वेदना होऊ लागल्या. परराज्यातून आलेल्या असल्याने जिल्हा प्रशासनाकडील मान्सुनपुर्व नोंदणी केलेल्या गर्भवती स्त्रियांच्या यादीत त्यांचे नाव नव्हते. मात्र रात्री उशीरा याबाबत माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकाने वेळीच त्यांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढत चिक्याला ते परसेवाडा व तेथून प्राथमिक आरोग्य केंद्र टेकडा येथे स्थलांतरीत केले. त्यांची सुखरूप प्रसूती झाली आहे. दुसऱ्या एका प्रकरणात कल्पना सचिन परसे (वय ३२) रा. माडेमूल, ता. गडचिरोली यांना बुधवारी सकाळी सर्पदंश झाल्याच्या संशयावरून जिल्हा बचाव पथकाच्या टिमने पुराच्या वेढ्यामुळे रस्ता बंद असल्याने त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढून सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचारार्थ दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून महिला आता सुरक्षित आहे. मूलचेरा तालुक्यातील वेंगनूर येथील पायल गावडे ( वय २३) या गर्भवतीला छातीत दुखत असल्याबाबत स्थानिक आशा वर्कर यांनी कळविले. त्यानंतर महिलेला स्थानिक बचाव पथकाद्वारे सुखरुपरित्या बाहेर काढुन पुढील उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी येथे सरकारी इस्पितळात भरती करण्यात आले आहे. चौथ्या प्रकरणात गडचिरोली ते आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील पाल नदीवरील पुलावरील पाणी जमा झाले होते. पाण्याचे अंदाज न आल्याने एक ट्रकचालक वाहनासह या पुलावर अडकल्याची माहिती मिळताच त्यालाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. राजकुमार कृष्णमूर्थी नावाचा हा वाहनचालक तामिळनाडू राज्यातील एलियार जिल्ह्याचा आहे.दरम्यान
जिल्ह्याच्या दक्षिण भागात महाराष्ट्र – तेलंगणा या दोन राज्यांना जोडणाऱ्या आंतरराज्यीय पुलाजवळ (वांगेपल्ली) गावात रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांना याबाबत माहिती मिळताच ते प्रत्यक्ष ठिकाणावर उपस्थित झाले. त्यांनी बांधकाम विभागामार्फत जेसीबी, ट्रॅक्टरच्या साहाय्याने बोल्डर, गिट्टी टाकून तत्काळ तेथील खड्डे बुजवून घेतले. यासोबतच या भागात रस्त्यावर पडलेले इतर खड्डेही तत्काळ बुजविण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले.









