राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)कडून अहेरी विधानसभेच्या मैदानात धर्मरावबाबा आत्राम

166

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २३ : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून अहेरी विधानसभेसाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बुधवार (ता.२३) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून ३८ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यात आत्राम यांचा समावेश आहे.

राजकीयदृष्ट्या गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या अहेरी विधानसभेवरून महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्रपक्षांमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप ही जागा मागेल किंवा येथून उमेदवार देत मैत्रिपूर्ण लढत देईल असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. मात्र, बुधवारी अजित पवार गटाकडून येथे विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे नाव जाहीर करण्यात आले. या यादीत सातव्या क्रमांकावरच आहे. त्यामुळे या जागेवरील महायुतीतील तिढा अखेर सुटला आहे . परंतु भाजपपुढे आता बंडखोरीचे आव्हान उभे झाले आहे. याठिकाणी उमेदवारी डावलल्याने मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे पुतणे तथा भाजपचे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. उमेदवारी मिळणार नाही, याची कुणकुण लागतात अम्ब्रीशराव आत्राम हे दोन दिवसांपूर्वीच मुंबईला रवाना झाले आहेत. या ठिकाणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश करून थेट वडिलांनाच आव्हान दिले होते. त्यामुळे अहेरी विधानसभेत यंदा आत्राम राजघराण्यांमध्येच मोठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीकडून देखील याजागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दावा केला आहे. आता तिथून कोणाचे नाव जाहीर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

—————————————–