गडचिरोलीच्या क्रीडा विकासात योगदान देईल : मो. अझरूद्दीन

170

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २० : जीपीएलचे सामने ज्या जिल्हा क्रीडांगणावर होत आहेत त्याचा विकास करून टर्फ विकेट केल्यास येथे रणजी सामनेसुद्धा सहज खेळवता येतील. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा करावा. या जिल्ह्याच्या विकासासाठी मी सर्वतोपरी योगदान देण्यास तयार आहे, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व प्रसिद्ध क्रिकेटपटू मो. अझरूद्दीन यांनी केले.

विजय वडेट्टीवार फॅन्स क्लबच्या वतीने सोमवार (ता. २०) स्थानिक जिल्हा प्रेक्षागार स्टेडियमवर ‘गडचिरोली प्रीमियर लीग’ (जीपीएल) (लेदर बॉल) क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध क्रिकेटपटू मो. अझरूद्दीन व मराठी अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर क्रिकेटपटू मो. अझरुद्दीन, अभिनेत्री श्रुती मराठे, विदर्भाकडून रणजी सामने खेळणारे प्रसिद्ध क्रिकेटपटू फैज फजल, राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वाडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष अॅड. कविता मोहरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे मार्गदर्शन करताना मो. अझरूद्दीन म्हणाले की, लोकांचा आशीर्वाद व प्रेम मिळाल्यानेच मी चांगला क्रिकेटर झालो. अलिकडे खेळात नाहक आक्रमकात खुप वाढली आहे. पण खेळाडूंनी चांगले खेळावे, भांडू नये, खेळाचा आनंद घ्यावा. हा जिल्हा मागास असला, तरी येथे गुणवंत खेळाडूंची खाण आहे. पण गरीब परीस्थितीमुळे अनेक खेळाडू पुढे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधी, उद्योजकांनी अशा चांगले खेळाडू निवडून त्यांना प्रायोजकत्व दिले पाहिजे असेही ते म्हणाले. १९८६ मध्ये कानपूर येथे झालेल्या सामन्यात आपण धडाकेबाज फलंदाजी करताना १९९ धावांवर विकेट गमावली. माझ्यासह सगळा देश हळहळला होता. त्या रात्री मी अजीबात झोपू शकलो नाही, अशी आठवण मो. अझरूद्दीन यांनी सांगितली.अभिनेत्री श्रुती मराठे म्हणाल्या की, मला या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला का बोलवले, असा अनेकांना प्रश्न पडला असेल. पण माझे खेळाशी जुने नाते आहे. मी कराटेमध्ये ब्राऊन बेल्ट आहे. क्रिकेटसुद्धा खेळली आहे. त्यामुळे त्यावर अधिकारवाणीने बोलू शकते. येथे स्पर्धेचे उत्तम आयोजन केले आहे. इथल्या खेळाडूंना योग्य संधी मिळाल्यास ते भारतीय संघात निश्चितच जाऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या. आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, सध्या समाजात, धर्मात जी विषाची पेरणी सुरू आहे ती उपटण्याचे काम खेळच करू शकतात. खेळामुळे एकत्वाची भावना वाढते. म्हणून जीपीएलचे हे आयोजन अतिशय महत्त्वाचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मुले गुणवत्तेत अजिबात कमी नाहीत. आज इथली मुले व्हिसीएमध्ये खेळत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जिल्ह्यातील सीएसआर निधी, खनिज राजस्व निधी नेमका कुठे खर्च होतो, याचा शोध घेतला पाहिजे. इथल्या खेळाडूंना योग्य सुविधा मिळाल्यास गडचिरोलीचा खेळाडू भारतीय संघात दिसेल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी चंद्रपूरचा आमदार असलो, तरी गडचिरोली जिल्ह्यावर माझे प्रेम आहे. या जिल्ह्याचा विकास होईपर्यंत मी राजकारणातून आउट होणार नाही, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक विजय वडेट्टीवार फॅन्स क्लबचे अध्यक्ष राकेश नागरे, तर संचालन किशोर पाचभाई यांनी केले. पहिला उद्घाटकीय सामना रामनगर रॉयल व गडचिरोली लायन्स या संघादरम्यान खेळवण्यात आला. कार्यक्रमाला क्रीडाप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी बंडू शनिवारे, विनोद मैद, अजय बर्लावार, राहुल निलमवार, मंगेश देशमुख, अनुराग कुडकावार, प्रसाद कवासे, आशीष वाळके आदींसह विजय वडेट्टीवार फॅन्स क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य सहकार्य करत आहेत.

——————————-