ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २१ : जिल्ह्यात दारुबंदी असतानाही अवैधरित्या छुप्या रीतीने दारूविक्री व वाहतूक केली जाते. त्याविरुद्ध कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिले असून सोमवार (ता. २०) एका चारचाकी सिल्वर करलची फोर्ड कंपनीची फिएस्टा वाहनासह पोलिसांनी एकूण ३ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
काही व्यक्ती आरमोरी दिशेकडून वडसा मार्गे अवैध दारूची वाहतुक करणार आहेत, अशी गोपनिय माहिती पोलिस अंमलदार शैलेश तोरकपवार यांना मिळाली. त्यांनी ही माहिती वडसा येथील पोलिस निरीक्षक अजय जगताप यांना दिली. पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात वडसा पोलिस स्टेशन पोलिस पथकाने वाहनाचा पाठलाग केला. पाठलाग करत असताना शंकरपूर येथून वाहनचालक हा पोलिसांना चकमा देऊन कुरखेडाच्या दिशेने वेगाने पळून गेला. पोलिस निरीक्षक जगताप यांनी कुरखेडा येथील पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांना माहिती दिली. माहितीवरून कुरखेडा पोलिस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकासह गोठणगावाजवळ सापळा रचून बसले असता रात्री १० वाजता दरम्यान एक चारचाकी फोर्ड कंपनीची फिएस्टा वाहन हे भरधाव वेगाने येताना दिसली. त्यावेळी पोलिसांनी वाहन चालकाला हात दाखवून त्यास वाहन थांबविण्याचे प्रयत्न केले असता वाहन चालक पोलिसांना हुलकावणी देऊन भरधाव वेगाने पळून गेला. त्यानंतर या वाहनाचा पाठलाग करून कढोली येथील तुकाराम विद्यालयासमोर वाहनाला थांबविण्यात आले. त्यावेळी वाहन रस्त्यावर उभे करून वाहनचालक अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळून गेला होता. त्यानंतर या वाहन चालकाचा शोध घेतला असता तो सापडला नाही. या वाहनाच्या तपासणी दरम्यान त्यात खाकी रंगाच्या खर्ड्यामध्ये एकूण २५ पेटी ज्यामध्ये प्रत्येकी देशी दारू टायगर ब्रॉन्ड संत्रा कंपनीचे ९० एम.एल. मापाच्या ९५ नग निपा असे एकूण २३७५ नग निपा किंमत अंदाजे १, ४२, ५०० आढळून आला. या अवैध दारूसह एक चारचाकी फोर्ड कंपनीची फिएस्टा वाहन क्र. एम. एच. ३१ सी. एन. ७१२० किंमत अंदाजे २, ००, ००० रुपये असा एकूण ३ लाख ४२ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित घटनेच्या अनुषंगाने कुरखेडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी डॉ. श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप व कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात कुरखेडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ, पोलिस उपनिरीक्षक दयानंद भोंबे, पोलिस हवालदार शेखलाल मडावी, पोलिस अंमलदार संदेश भैसारे, पोलिस अंमलदार नरसिंग कोरे, वडसा येथील पोलिस निरीक्षक अजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक मनीष गोडबोले, पोलिस उपनिरीक्षक चेतन परदेशी, पोलिस हवालदार राकेश डोनाडकर, पोलिस अंमलदार शैलेश तोरकपवार, नितेश यांनी पार पाडली.









