४० सु्गंधित तंबाखु विक्रेत्यांवर आरमोरी पोलिसांची कारवाई

68

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. २५ : जिल्ह्यातील आरमोरी येथील विविध गावांतील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रेत्या एकूण ४० पानठेला व दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई केली.

महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखु विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला असतानासुद्धा गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखुची विक्री व वाहतुक करणाऱ्यांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू अवैध दारू, जुगार व इतर अवैध व्यवसायांवर छापा मारून प्रभावीपणे कायदेशीर कठोर कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने शुक्रवार (ता. २४) आरमोरी पोलिस स्टेशन हद्दीतील आरमोरी, वैरागड, देऊळगाव, वडधा, ठाणेगाव, मानापूर, अरसोडा, बर्डी, वघाळा, जोगीसाखरा व अंतरंजी या गावांमधील शाळापासून १०० मीटर जवळ असलेल्या तसेच गावाच्या मुख्य रस्त्यावर असलेले पानटपरी (पानठेला) तसेच दुकानामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले सुगंधित तंबाखू विक्रीसाठी ठेवत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने वरीष्ठांच्या मार्गदर्शनात आरमोरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक गवते यांनी पोलिस पथकासह या गावांतील काही पानटपरी (पानठेला) तसेच दुकानात तपासणी केली असता अल्पशा प्रमाणात सुगंधित तंबाखू आढळून आला. ४० पानटपरी (पानठेला) तसेच दुकानदार यांच्यावर कारवाई करून प्रत्येकी २०० रुपयेप्रमाणे एकूण ८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच त्यांना आपल्या पानटपरी (पानठेला) व दुकानात सुगंधित तंबाखू न विकण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश तसेच गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनात आरमोरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलाश गवते यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक नरेश सहारे, दिलीप मोहुर्ले, देवराव कोडापे, सहायक फौजदार गौरकार, पोलिस हवालदार गोन्नाडे, पिल्लेवारन, कुमरे व पोलिस अंमलदारांनी केली.

—————————-