अतिदुर्गम पेनगुंडा पोलिस मदत केंद्रात पहिल्यांदाच फडकला

72

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २७ : देशाचा ७६ वा प्रजासत्ताकदिन गडचिरोली पोलिस मुख्यालयात सह पालकमंत्री अॅड. आशीष जयस्वाल व पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे अतिदुर्गम पेनगुंडा येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या पोलिस मदत केंद्रात पहिल्यांदाच प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला.

पोलिस मुख्यालयात गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री अॅड. आशीष जयस्वाल यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलिस दलाकडून पथसंचलन तसेच चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्रात ७६ वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मागील महिन्यात ११ डिसेंबर २०२४ रोजी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पेनगुंडा पोलिस मदत केंद्रातसुद्धा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. अतिदुर्गम अशा माओवाद प्रभावित पेनगुंडा येथे पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील सुमारे १५० ते २०० नागरिक माओवाद्यांच्या खोट्या क्रांतीला व पोकळ धमक्यांना न जुमानता या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत पोलिस मदत केंद्र स्तरावर क्रिकेट आणि व्हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आष्टी पोलिस स्टेशनअंतर्गत कोनसरी बाजारवाडी येथे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनात अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे, आष्टी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक विशाल काळे व इतर अधिकारी, अंमलदार, कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील तसेच आजुबाजुच्या परिसारातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत कोनसरी येथे राष्ट्रध्वज फडकवून कोनसरी बीट कार्यान्वि करण्यात आले.७६ व्या प्रजासत्ताकदिन कार्यक्रमाप्रसंगी माओवाद विरोधी अभियानात आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या शौर्याचे प्रदर्शन करणारे ५ पोलिस नाईक अंमलदार यांना पोलिस हवालदार व १ पोलिस हवालदार यांना सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर अशा एकूण ६ जवानांना वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

——————————-