ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ३ : तब्बल २८ लाख रुपयांचे बक्षिस असलेल्या चार जहाल माओवाद्यांनी पोलिस व केंद्रीय राखिव पोलिस दलापुढे आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांमध्ये अशोक पोच्या सडमेक ऊर्फ बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर(वय ६३) पद- डी.व्हि.सी.एम टेक्नीकल टीम रा. अर्कापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली, वनिता दोहे झोरे (वय ५४) पद- एसीएम टेक्नीकल टीम, रा. कोरनार, ता. एटापल्ली. जि. गडचिरोली, साधू लिंगु मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर (वय ३०) पद- प्लाटून-३२ सदस्य, रा. तुमरकोडी, ता. भामरागड जि. गडचिरोली व मुन्नी पोदीया कोरसा (वय २५)पद- पार्टी सदस्य रा. सिलीगेंर ता. कोळा, जि. सुकमा (छत्तीसगड) यांचा समावेश आहे. यात अशोक पोच्या सडमेक हा डीव्हीसीएम (Divisional committee member) दर्जाचा वरीष्ठ कॅडर आहे, वनिता झोरे ही एसीएम (Area Committee Member) व साधू मोहंदा तसेच मुन्नी कोरसा हे दोघे सदस्य आहेत. अशोक पोच्या सडमेक ऊर्फ बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर १९९१ मध्ये अहेरी दलममध्ये भरती होऊन १९९५ पर्यंत कार्यरत होता. १९९५ ते १९९७ पर्यंत बालाघाट परिसरात ताडा दलम (म.प्र.) मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन कार्यरत, १९९८ ते १९९९ अहेरी दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता, २००० मध्ये चामोर्शी दलममध्ये कंमाडर पदी पदोन्नती होऊन सन २००३ पर्यंत काम केले. २००३ मध्ये डिव्हिसीएम पदावर पदोन्नती होऊन चामोर्शी दलममध्ये सन २००५ पर्यंत कार्यरत होता. २००५ ते २००७ पर्यंत अहेरी दलम कंमाडर म्हणून काम केले. २००७ ते २०१७ पर्यंत नक्षल साहित्य शिक्षण सामितीमध्ये कार्यरत राहुन नियुक्ती दलमसोबत नक्षल संघटनेबाबत शिक्षण देण्याचे काम केले. २०१८ मध्ये टेक्नीकल टिममध्ये बदली होऊन आजपर्यंत कार्यरत होता. त्याच्यावर आजपर्यंत एकूण ८२ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ३१ चकमक, १७ जाळपोळ, व ३४-इतर गुन्ह्रांचा समावेश आहे. वनिता दोहे झोरे १९९३ मध्ये एटापल्ली दलममध्ये भरती होऊन सन १९९५ पर्यंत कार्यरत होती. १९९५ मध्ये टिपागड दलममध्ये बदली होऊन सदस्य पदावर १९९९ पर्यंत कार्यरत होती. १९९९ मध्ये नॅशनल पार्क महिला दलममध्ये कंमाडर पदावरा पदोन्नती झाली. २००५-२००६ मध्ये टेक्कामेट्टा जवळपासच्या गावात जनताना सरकार स्कुलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. २००६ ते २०१० पर्यंत अबुझमाड मधील जटवाही, कुतुल, नेलनार या गावात ४ वर्षे जनताना स्कुलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. २०१० मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन कार्यरत होती. २०१० ते २०१९ मध्ये गावागावात जाऊन मिटींग घेऊन जनताना सरकारसाठी काम केले. २०१९ ते २०२२ पर्यंत उसेवाडा एरीयामध्ये काम केले. २०२२ मध्ये टेक्नीकल टीममध्ये बदली होऊन आजपर्यंत कार्यरत होती. तिच्यावर आजपर्यंत एकूण ११ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १ चकमक, २ जाळपोळ व ८ इतर गुन्ह्रांचा समावेश आहे. साधू लिंगु मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर २०११ मध्ये जनमिलिशिया म्हणून भरती होऊन भामरागड दलमसोबत २०१२ पर्यंत काम केले. २०१२ मध्ये सदस्य पदावर बढती होऊन भास्कर हिचामी याचा अंगरक्षक म्हणून २०१७ पर्यंत काम केले. २०१७ मध्ये कसनसूर दलममध्ये बदली होऊन कार्यरत होता. २०१८ मध्ये कसनासुर-बोरीया चकमकीमध्ये जखमी झाल्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये स्टाफ टिममध्ये बदली होऊन सन २०२१ पर्यंत काम केले. जुलै २०२१ मध्ये प्लाटून ३२ मध्ये बदली होऊन आजपर्यत सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावर आजपर्यंत एकूण ४ गुन्हे दाखल असून त्यामध्ये २ चकमक व २ इतर गुन्ह्रांचा समावेश आहे. मुन्नी पोदीया कोरसा २०१५ मध्ये बासागुडा दलममध्ये भरती झाली. २०१६ मध्ये प्लाटून क्र. ७सदस्य पदावर बदली होऊन २०१८ पर्यंत कार्यरत होती. २०१८ मध्ये प्लाटुन क्र. ३२ मध्ये प्लाटून सदस्य म्हणून बदली, २०१९ मध्ये सप्लाय टिममध्ये बदली होऊन २०२१ पर्यंत कार्यरत होती. २०२१ मध्ये माड डिव्हिजनमध्ये बदली होऊन जनताना सरकार स्कुलमध्ये शिक्षक म्हणून आजपर्यंत काम केले. हिंसक घटनांमध्ये तिचा सहभाग असल्याची पडताळणी करणे सुरू आहे. २०२२ ते आतापर्यंत एकूण ५० जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच सन २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण १७ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्याची कारवाई पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, सीआरपीएफचे पोलिस उप-महानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, बटालियन ९ चे कमांडंट शंभू कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलिस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा, असेही त्यांनी म्हटले आहे.









