ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, १० : सहा विविध वाहन चोरीच्या गुन्ह्यांत सहभागी असण्यासोबतच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ३ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकीसुद्धा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. समीर राजरतन चहांदे ( वय ३६)रा. रुही, पो. निलज, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर, असे या अट्टल वाहनचोराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या वाहन चोरीचे प्रकार वाढले असल्याने त्याबाबत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी वेळोवेळी कठोर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने देसाईगंज पोलिस स्टेशन येथे ६ फेब्रवारी २०२५ रोजी कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये अप.क्र. ५३/२०२५ नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास चालू असताना ७ फेब्र्वारी २०२५ रोजी देसाईगंज पोलिस स्टेशन येथील सहायक पोलिस निरीक्षक आगरकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, संशयित समीर राजरतन चहांदे हा आमगाव, देसाईगंज येथे त्याच्या ताब्यातील दुचाकी वाहन विकण्याच्या तयारीत आहे. या माहितीवरून वरीष्ठांच्या मार्गदर्शनात देसाईगंज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांना याबाबत कळवून त्यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक आगरकर हे आपल्या पोलिस पथकासह संशयिताचा शोध घेण्याकरिता रवाना झाले. त्या ठिकाणी पोहचताच संशयित समीर चहांदे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली. त्याच्या जवळ असलेले हीरो कंपनीचे एच.एफ. डिलक्स वाहन क्र. एम. ३३ वाय. ३७२० हे चोरीचे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अटकेनंतर आरोपीकडे अधिक सखोल चौकशी केली असता देसाईगंज पोलिस स्टेशन येथे दाखल अप.क्र. ५३/२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं., अप.क्र. ५२०/२०२३ कलम ३७९ भा.द.वी., अप.क्र. १७३/२०२३ कलम ३७९ भा.द.वी., तसेच आरमोरी पोलिस स्टेशन येथे दाखल अप.क्र. ०२३/२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं., आणि चंद्रूपर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे दाखल अप.क्र.१६/२०२५ कलम ३०३(३) भा.न्या.सं. व अप.क्र.५२/२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं. अशा विविध पोलिस स्टेशन येथील अभिलेखावर दाखल एकूण ६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच या व्यतिरिक्त सदर आरोपीने पाथरगोटा जि. गडचिरोली गावाच्या हद्दीतून एक दुचाकी बजाज कंपनीची डिस्कव्हर १५० सी.सी. वाहन क्रमांक एम.एच. ३३ जे. २४५८ चोरी केल्याचे उघड झाले आहे. देसाईगंज पोलिसांनी आपल्या तपास कौशल्यांचा वापर करून आरोपीकडे केलेल्या सखोल चौकशी दरम्यान एकूण सहा गुन्ह्यातील सहा दुचाकी वाहन किंमत अंदाजे ३ लाख ५ हजार रुपये व अन्य एक दुचाकी वाहन किंमत अंदाजे ७५ हजार रुपये असा एकूण ३ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केलेला आहे. अधिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, या गुन्ह्यातील अटक आरोपीवर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन येथे चोरी, लैंगिक अत्याचार व विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.या गुन्ह्याचा पुढील तपास देसाईगंज पोलिस स्टेशन येथील सहायक पोलिस निरीक्षक आगरकर करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश तसेच कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक संदीप आगरकर, पोलिस शिपाई दिनेश सोनकुसरे, सतीश बैलमारे, विलास बालमवार, नितेश कडव यांनी पार पाडली.









