पीएम गतिशक्ती’योजनेसाठी नोडल अधिकारी नेमा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

85

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ११ : केंद्र शासनाच्या ‘पीएम गतिशक्ती’ योजनेच्या अंमलबजावणीकरिता गडचिरोली जिल्ह्याची पायलट प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली असून लॉजिस्टिक्स व पायाभूत सुविधा क्षेत्रात विकासासाठी या योजनेअंतर्गत प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नेमावा आणि आपली माहिती ऑनलाइन भरावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व संबंधित विभागांना दिले.

पीएम गतिशक्ती योजनेचा आढावा जिल्हाधिकारी पंडा यांनी सोमवार (ता. १०) नियोजन भवन येथे घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी राहुल मीना, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, पीएम गतिशक्तीचे जिल्हा समन्वयक रवी चथा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. ‘पीएम गतिशक्ती’ही देशातील पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या समन्वित विकासासाठी राष्ट्रीय मास्टर प्लॅन आहे. या योजनेअंतर्गत रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, जलमार्ग, औद्योगिक कॉरिडॉर आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे लॉजिस्टिक्स खर्च कमी होणार असून, प्रकल्प वेगाने पूर्ण होतील आणि आर्थिक वाढ होईल. गडचिरोली जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने या योजनेचा पायलट प्रोजेक्ट महत्त्वाचा ठरणार आहे. प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नियुक्त करून आपल्या विभागाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती पीएम गतिशक्ति प्लॅटफॉर्मवर अपलोड करावी. यामध्ये रस्ते, जलसंपदा, ऊर्जा, शिक्षण आणि इतर महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचा समावेश आहे. सर्व विभागांनी वेळेत माहिती भरून अंमलबजावणी प्रक्रिया गतिमान करण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याबाबत पुढील बैठक १४ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. पीएम गतिशक्तीचे जिल्हा समन्वयक रवी चथा यांनी योजनेची माहिती दिली. आढावा सभेला सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.