ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २ : चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना शनिवार (ता. १) रात्री घडली. संतोष भाऊजी राऊत (वय ४५) रा.गणपूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
संतोष राऊत यांचे शेत वैनगंगा नदीकाठाजवळ आहे. त्यांनी शेतात मका पिकाची लागवड केली आहे. शनिवारी संध्याकाळी मक्याच्या पिकाला पाणी द्यायला ते गेले होते. मात्र उशिरापर्यंत ते घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य शेतशिवारात गेले असता संतोष राऊत यांचा मृतदेह शेतशिवारालगत आढळला. त्यांच्या पायाचा लचका तोडलेल्या अवस्थेत होता. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत संतोष राऊत यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परीवार आहे. या प्रकरणाचा तपास वनपरीक्षेत्र अधिकारी इनवाते करत आहेत










