ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १२ : जिल्ह्यातील भामरागड येथील जिल्हा परिषद समुह निवासी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून शाळेतील अल्पवयीन बालिकांसोबत अश्लील कृत्य केले जात असल्याची घटना समोर आली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या वसतिगृहातील वाॅर्डनने वसतिगृहातील सर्व विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच बाबत माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार ८ मार्च २०२५ रोजी समुह निवासी शाळेच्या वसतिगृहातील वाॅर्डन सर्व विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टचबाबत माहिती देत असताना अशा प्रकारे कोणाला काही त्रास असल्यास न घाबरता आपल्या जवळ सांगावे, असे सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ९ मार्च २०२५ रोजी वसतिगृहातील काही विद्यार्थीनींनी वाॅर्डन जवळ येऊन आपल्यासोबत घडलेली घटना सांगू लागल्या, वार्डनने अल्पवयीन बालिकांना विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता दोन बालिकांनी समुह निवासी शाळेचा मुख्याध्यापक मालू नोगो विडपी जुलै २०२४ पासून त्यांना वेगवेगळ्या वेळी इतर कोणीही नसताना शाळेतील छतावर, शाळेच्या ऑफिसमध्ये बोलावून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करतो, तसेच या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मारण्याची, बलात्कार करण्याची व शाळेतून काढण्याची धमकी देतो, असे सांगितल्यानंतर तत्काळ वाॅर्डनने गांभीर्य लक्षात घेऊन बालिकांच्या पालकांना माहिती दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वाॅर्डन व पालकांनी भामरागड पोलिस स्टेशन येथे जाऊन ११ मार्च २०२५ रोजी फिर्याद दिली होती. यावरून भामरागड पोलिसांनी जिल्हा परिषद समुह निवासी शाळेचा मुख्याध्यापक मालू नोगो विडपी ( वय-५०), रा. ता. भामरागड, जि. गडचिरोली याच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला असून या गुन्ह्याच्या संबंधाने ११ मार्च २०२५ रोजी आरोपी मुख्याध्यापक विडपी याला भामरागड पोलिसांनी अटक केली होती. बुधवार (ता.१२) आरोपी मुख्याध्यापकास अहेरी येथील जिल्हा व सत्र न्यायालय न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास भामराड येथील महिला पोलिस उपनिरीक्षक धनश्री सगणे करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी एम. व्ही. सत्यसाई कार्तिक तसेच भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात भामरागड पोलिस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक.दीपक डोंब यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक धनश्री, सगणे व अंमलदारांनी केले आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आश्वासन दिले आहे की, या प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करून आरोपीना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी गडचिरोली पोलिस दल प्रयत्नशील राहील.










