चोरून नेत होते रेती, अलगद आले महसूल विभागाच्या हाती

141

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३० : महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेतीतस्करीविरोधात कारवाई करत गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी येथील घाटातून रॉयल्टीविना रेती वाहतूक करणारे तीन मोठे ट्रक रेतीसह जप्त केले. हे तिन्ही ट्रक अमरावती येथील असल्याने आंबेशिवणीच्या घाटातून गडचिरोलीतील उच्च दर्जाच्या रेतीची थेट पश्चिम विदर्भात तस्करी होत असल्याचे स्प्षष्ट झाले आहे.

सोमवारी २८ एप्रिल रोजी मध्यरात्री आंबेशिवणी येथील घाटातून रेती उपसून ती रॉयल्टीविना मोठ्या ट्रकमधून गोगावमार्गे आरमोरी, नागपूर व पुढे अमरावतीला नेण्यात येत होती. काही ट्रक पुढे निघून गेले. परंतु एका ट्रकचालकाच्या चुकीमुळे तीन ट्रक गोगावनजीकच्या अडपल्ली येथे भलत्याच रस्त्याकडे गेले आणि अरुंद रस्त्यात फसले. या विषयीची माहिती मिळताच मंगळवारी २९ एप्रिल रोजी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. यावेळी ट्रकमधून रॉयल्टीविना रेतीची वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून रेती आणि ट्रक ताब्यात घेतले. यातील ट्रक शकीब अन्वर खान नईम खान, मोहम्मद इद्रिस युसुफ व मुहसर हुसैन अल्ताफ हुसैन यांच्या मालकीचे असून, तिघेही अमरावती येथील रहिवासी आहेत. दोन ट्रकमधून प्रत्येकी ६ ब्रास आणि तिसऱ्या ट्रकमधून ८ ब्रास अशी एकूण २० ब्रास रेती जप्त करण्यात आली. बयाण नोंदविल्यानंतर संबंधितांकडून शासकीय नियमानुसार दोन ट्रकवर रेतीसंबंधीचा २ लाख २३ हजार २०० रुपये व तिसऱ्या ट्रकवर १ लाख ४८ हजार ८०० रुपये दंड आकारण्यात येईल. शिवाय प्रतिट्रक २ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे मागील आठवड्यात गडचिरोलीचे माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यात शंभर कोटी रुपयांची रेती तस्करी होत असल्याचा आरोप केला होता. अशातच तीन ट्रक पकडल्याने डॉ. होळी यांच्या आरोपात तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. आंबेशिवणी येथील घाटातून मोठ्या प्रमाणावर रेती वाहतूक होत असून, त्यात काही राजकीय नेते सहभागी असल्याचे बोलले जात आहे. या रेतीघाटातून तस्करी करणारे बरेचजण कोट्यवधींचे मालक झाले आसून त्यांनी शहरात आले इतरही व्यवसाय सुरू केले आहेत. जिल्ह्यात कोट्यवधींची रेती तस्करी करणारे उजळमाथ्याने फिरत आहेत. काहीजण सामाजिक, धार्मिक उपक्रमांचे नाटक करून आपले चारीत्र्य शुद्ध असल्याचे भासवत या अवैध व्यवसायात लिप्त असल्याचीही चर्चा आहे.

—————————–