ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २९ : येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत वरीष्ठ लिपिक विलास वासनिक मोटारसायकलसह हायवा ट्रकखाली येऊन गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने पोलिसांच्या हेलिकाॅप्टरने नागपुरला उपचारार्थ पाठवण्यात आले. पण अखेर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्हा व सत्र न्यायालय चौकात मंगळवार २९ एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास हायवा ट्रकची मोटारसायकलला धडक बसून मोटारसायकर ट्रकखाली आल्याने पोलिस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी ठार झाला. विलास शंकर वासनिक (वय ५७) रा. मुरखळा,असे मृताचे नाव असून ते पोलिस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. विशेष म्हणजे वासनिक यांचा डावा पाय जखमी झाला होता. त्यांना लगेच हेलिकॉप्टरने नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी विलास वासनिक हे कार्यालयाकडे जात असताना त्यांची मोटारसायकल एमएच-३४ एम-८९७० क्रमांकाच्या हायवा ट्रकच्या चाकाखाली सापडली. यात त्यांचा डावा पाय पूर्णतः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर विलास वासनिक यांना शहर पोलिसांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तातडीने उपचारानंतर त्यांना हेलिकॉप्टरने नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पण तिथे गेल्यावरही त्यांचे प्राण वाचू शकले नाही. डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत वासनिक यांचा मुलगा बाबासाहेब वासनिक हा देखील पोलिस दलात कार्यरत असून, सध्या कोठी पोलिस मदत केंद्रात कर्तव्यावर आहे. पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे घटनेचा तपास करॉत आहेत. दरम्यान प्रभारी पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेत वासनिक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. प्रकृती चिंताजनक असल्याने देशमुख यांनी वासनिक यांना हेलिकॉप्टरने नागपूरला नेण्याची व्यवस्था केली. पण अखेर त्यांना मृत्यूने गाठलेच.










