उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकून दोघे ठार

204

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ११ : चामोर्शी-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावरील कुरूड जवळ उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची जबर धडक बसल्याने दुचाकी स्वारासह मागे बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता.११) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

प्रतीक नीलकंठ निमसरकार (वय २६) रा. आष्टी, ता. चामोर्शी जि. गडचिरोली, सचिन विनायक रोहणकर (वय २५) रा. चामोर्शी, असे मृतांचे नाव आहे. मृत प्रतिक निमसरकर व सचिन रोहनकर हे दुचाकीने गडचिरोलीवरून चामोर्शीकडे येत असताना महावितरणचे साहित्य भरुन असणारा ट्रॅक्टर कुरूडनजिक रस्त्यावर उभा होता. या ट्रॅक्टरला दुचाकीची जबर धडक बसली यात सचिन व प्रतिक या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिस घटनास्थळी पोहोचले व मृतदेह चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनेचा पुढील तपास चामोर्शी पोलिस करत आहेत.