गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केला छत्तीसगड सिमेवरचा माओवाद्यांचा तळ

110

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. १२ : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कवंडे पोलिस स्टेशनजवळ माओवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात करण्याच्या उद्देशाने तळ उभारल्याची विश्वसनीय माहिती गडचिरोली पोलिसांना प्राप्त झाली.गडचिरोली पोलिसांनी शौर्यपूर्ण कामगिरी करत माओवाद्यांचा हा तळ उद्ध्वस्त केला.

प्राप्त माहितीच्या आधारे अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० दलाचे सुमारे २०० जवानांचे विशेष अभियान रविवार (ता.११) संध्याकाळी राबवण्यात आले. आज (ता. १२) सकाळी या जंगल परीसरात शोध घेत असताना माओवादी संघटनांनी पोलिसांवर हल्ला चढवून अंदाधुंद गोळीबार केला. सी-६० जवानांनी त्वरित प्रत्युत्तर दिले. ही चकमक तीन वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास दोन तास चालू होती. चकमकीनंतर परिसरात करण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर माओवाद्यांचा शस्त्रासाठा जप्त करण्यात आला. एक स्वयंचलित इन्सास रायफल, एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझीन, अनेक जिवंत काडतुसे, डिटोनेटर, एक रेडिओ, तीन पिट्टू(सामानाची पिशवी), वॉकीटॉकी चार्जर आदी माओवादी साहित्य आणि वैयक्तिक वस्तू जप्त करता हा माओवादी तळ सी-६० जवानांनी पूर्णतः उद्ध्वस्त केला आहे. चकमकीत काही माओवादी जखमी अथवा ठार झाल्याची शक्यता असून त्यांना इतर माओवाद्यांनी जंगलात नेले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या भागात अजूनही अभियान सुरू असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. यासंबंधी अधिक तपशील लवकरच प्रसिद्ध केला जाईल, असे पोलिस विभागाने कळवले आहे. माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

———————————