ग्लोबल गडचिरोली न्यूज
सिरोंचा, ता. १४ : भारतीय जनता पक्षाच्या वतीने सिरोंचा तालुक्यातील शासकीय विश्रामगृहात एक भव्य आणि उत्साही आढावा बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते होते.
या महत्त्वपूर्ण बैठकीत मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ.अशोक नेते म्हणाले की, आगामी १७ मे २०२५ रोजी होणाऱ्या ‘सिंदूर तिरंगा यात्रेच्या’ दरम्यान या ऐतिहासिक उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू. ही यात्रा देशभक्ती जागवणारी आणि सैनिकांच्या त्यागाला सलाम करणारी असल्याने प्रत्येक कार्यकर्त्याने यात मनापासून सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार डॉ. नेते यांनी केले. यावेळी सिरोंचा तालुक्याचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष श्रीनाथ राऊत यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत सत्कार करण्यात आला. त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करत माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी भाजप संघटनात्मक वाढीसाठी तातडीने तालुका कार्यकारिणी स्थापन करण्याचे निर्देश दिले. पुढे माजी खासदार डॉ. नेते म्हणाले की, ही यात्रा केवळ राजकीय उपक्रम नसून ती राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारा पवित्र उत्सव आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या यशस्वी मोहिमांमुळे भारताचा सन्मान जागतिक स्तरावर वाढला आहे. त्यामुळे आपणही देशासाठी कार्यरत सैनिकांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला सलाम करत ही यात्रा मोठ्या उत्साहाने यशस्वी करू. नुकत्याच झालेल्या व्हर्चुअल बैठकीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ठरल्याप्रमाणे प्रत्येक मंडळ स्तरावर ही यात्रा प्रभावीपणे राबवायची आहे. या बैठकीस भाजप जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष दामोदर एरीगेला, विनोद आकनपल्लीवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश गंजीवार, गजानन कालेशेपवार, देवेंद्र रनगू, युवा नेते शारिक शेख, पत्रकार इरफान पठाण, श्यामसुंदर मेचनेनी, अशोक शामला, कार्तिक पलकोटा, विजय कलशेपवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ही बैठक संघटनेच्या दृष्टीने अत्यंत फलदायी ठरली असून भविष्यात भाजपचे तालुका स्तरावरचे कार्य अधिक प्रभावीपणे विस्तारण्यासाठी ती प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
—–










