आरमोरीकरांसाठी खुशखबर! लवकरच तयार होणार ५७ कोटींची पाणीपुरवठा योजना

63

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १५ : अमृत योजना २.० अंतर्गत ५७ कोटींच्या आरमोरी शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांच्या हस्ते आज (ता. १५) करण्यात आले. या योजनेमुळे आरमोरीकरांची पाणीटंचाईची समस्या कायमची दूर होणार आहे.

यावेळी खासदार डाॅ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, तहसीलदार उषा चौधरी, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार कृष्णा गजबे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या पाणीपुरवठा योजनेचे काम गूणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याचे निर्देश देतानाच पाइपलाइन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते त्वरीत पूर्वस्थितीत करण्याचे व त्यामुळे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना सहपालकमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी दिल्या. ५७ कोटी रुपयांच्या या पाणीपुरवठा योजनेतून ९१ किलोमीटर लांबीची पाईपलाइन टाकून घराघरात शुद्ध नळपाणी पोहोचविण्यात येणार आहे. आरमोरी शहरातील प्रत्येक कुटुंबाला याचा थेट लाभ मिळेल, असे त्यांनी नमूद केले. सामान्य माणसाच्या अडचणी सोडवून आरमोरीसह संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जलद गतीने साधायचा असेल, तर सर्व जनप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन समन्वयाने काम केले पाहिजे, असे मत ॲड. आशीष जयस्वाल यांनी मांडले. धावणारे पाणी हळू चालवायला, चालणारे पाणी थांबवायला आणि थांबलेले पाणी जिरवायला शिका, असा पाणी वाचविण्याचा संदेश त्यांनी दिला. खासदार डाॅ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार कृष्णा गजबे यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. नगर परीषदेच्या मुख्याधिकारी माधुरी सलामे यांनी प्रास्ताविकातून अमृत पाणीपुरवठा योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाला नगरपरिषद, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

—————————————