प्राणहिता नदीत डोंगा उलटून एका महिलेचा मृ्त्यू…सुदैवाने माय-लेक वाचले

115

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

सिरोंचा, ता. २० : तालुका मुख्यालयापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या प्राणहिता नदीच्या नगरम घाटावर सोमवार १९ मे २०२५ रोजी सायंकाळी नदीपात्रात डोंगा उलटून एक महिला बुडाली. मात्र सुदैवाने याच डोंग्यातील माय-लेकाचे प्राण पोलिसांमुळे वाचू शकले.

प्राप्त माहितीनुसार सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुभद्रा कृष्णामूर्ती ताडबोईना (वय ४८) रा. हैदराबाद (राज्य- तेलंगणा), विनोदा सतीश पुसा (वय ३०) रा. नगरम, ता. सिरोंचा, जि. गडचिरोली आणि तिचा दोन वर्षांचा मुलगा ऋग्वेद सतीश पुसा हे तिघेही प्राणहिता नदीच्या नगरम घाटावर नदीतून डोंग्याने फिरण्यासाठी गेले होते. डोंगा नदीत खोलवर गेल्यानंतर अचानक डोंग्याचे नियंत्रण सुटले आणि डोंगा नदीतच उलटला. यात सुभद्रा ताडबोईना यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. दरम्यान डोंगा उलटल्यानंतर पाण्यात गटांगळ्या खाणारे विनोदा व तिचा बालक ऋग्वेद मदतीसाठी आरडा ओरड करू लागले. तेव्हा त्यांचा आवाज ऐकून घटनास्थळी तैनात असलेल्या सिरोंचा पोलिसांनी तत्काळ धाव घेत नदीत उडी मारून दोघांनाही वाचवले. या घटनेत मृ्त्यू झालेल्या सुभद्रा ताडबोईना यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढून सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. नदीत प्रवास करताना नागरिकांनी योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात व लाइफ जॅकेटचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

—————————————–