शेतातच गांजाची लागवड करून विकायची होती तयारी……पण पोलिसांनी पकडलेच

165

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २० : आपल्याच शेतामध्ये प्रतिबंधित अंमली पदार्थ असलेल्या गांजाचे उत्पादन घेऊन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी सोमवार (ता. १९) अटक केली.

सोमवारी मालेवाडा पोलिस मदत केंद्राच्या पोलिसांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, मौजा दामेश्वर येथे राहणारा मोहन यशवंत कोवाची याने त्याच्या राहत्या घरी अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) विक्रीकरिता साठवून ठेवला आहे. या माहितीच्या आधारे कुरखेडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात राजपत्रित अधिकारी म्हणून कोरची पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शैलेद्र ठाकरे तसेच मालेवाडा पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पायघन व त्यांचे पोलिस पथक दामेश्वर येथे रवाना झाले. मोहन यशवंत कोवाची ( वय ४२) रा. दामेश्वर, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली याच्या घरी पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरून पोलिस पथकाने त्याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये चार पिवळसर पांढऱ्या, हिरवट, करड्या रंगाच्या चुंगळींमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाचा अंमली पदार्थ (गांजा) आढळून आला. या चुंगळ्यांची पंचासमक्ष तपासणी केली असता दोन रेघट हिरवट रंगाच्या पिशव्यांमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले, बोंडे व बिया संलग्न असलेले कॅनबिस वनस्पती अंमली पदार्थ निव्वळ गांजा २८.०५० कि.ग्रॅ वजन असलेला एकूण १ लाख १२ हजार २४० रुपये किंमतीचा मुद्येमाल आढळला. आरोपीकडे अंमली पदार्थाबाबत अधिक विचारणा केली असता, त्याने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या शेतामध्ये हा अंमली पदार्थ उगवला असल्याचे कबूल केले. यावरून आरोपी मोहन कोवाची याच्याविरुद्ध पुराडा पोलिस स्टेशन येथे मंगळवार (ता. २०) गुन्हा दाखल करून गांजा जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास मालेवाडा पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पायघन करत आहेत.ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश तसेच कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात कोरची पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शैंलेद्र ठाकरे, मालेवाडा पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आकाश नाईकवाडी, पोलिस उपनिरीक्षक अभिजित पायघन, महिला सहायक फौजदार मंडपे, पोलिस हवालदार मळकाम, पोलिस हवालदार म्हशाखेत्री, हुंडरा, साजन मेश्राम यांनी पार पाडली.