आवडते चॅनेल पाहू देत नाही म्हणून १० वर्षीय मुलीने घेतला गळफास

144

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २३ : आवडते टीव्ही चॅनेल पाहू न दिल्याने मोठ्या बहिणीशी वाद घालून घराच्या मागील बाजूस असलेल्या झाडावर गळफास लावून दहा वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना कोरची तालुक्याच्या बोडेना गावात गुरुवार (ता. २२) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. सोनाली आनंद नरोटे (वय १०) रा. बोडेना, ता. कोरची, असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.

गुरुवारी सकाळी संध्या (वय १२), सोनाली व तिचा भाऊ सौरभ (वय ८) हे तिघेही टीव्ही पाहत होते. दरम्यान, आवडते चॅनेल पाहण्यावरून व रिमोट ताब्यात घेण्यावरून मोठी बहीण संध्या हिच्याशी सोनालीचे भांडण झाले. ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ असे म्हणत रिमोट ताब्यात घेण्यावरून सोनालीचा राग अनावर झाला. त्यानंतर तिने रागाच्या भरात घराच्या मागील बाजूस असलेल्या पेरूच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. माहिती मिळताच कोरचीचे पोलिस निरीक्षक शैलेश ठाकरे, सहायक पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मृतदेह कोरची ग्रामीण रुग्णालयात पाठविला. तेथे डॉ. राहुल राऊत यांनी उत्तरीय तपासणी केली. आश्रमशाळेत घेत होती शिक्षण सोनाली, संध्या व तिचा भाऊ सौरभ हे तिघेही गोंदिया जिल्ह्यातील कोकना (खोबा) गावातील एका खासगी आश्रमशाळेत शिकतात. उन्हाळी सुट्ट्या असल्याने ते घरी आले होते. वडिलांचे निधन झाल्याने सर्वात लहान भाऊ शिवम आईजवळ राहतो. यासंदर्भात कोरचीचे सहायक पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख म्हणाले की, मुलीने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सखोल चौकशीनंतरच आत्महत्येचे कारण समोर येईल. तपास सुरू आहे. या प्रकाराने बालकांच्या मानसिकतेविषयी जागरूकतेची गरज आहे. सर्व पालक वर्गाने अशा दुर्दैवी घटना रोखण्यासाठी मुलांशी संवाद आणि संवेदनशीलतेची भूमिका स्वीकारण्याची गरज आहे.

—————————