छत्तीसगडच्या सिमेवर पोलिसांनी चार जहाल माओवाद्यांना घातले कंठस्नान

129

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २३ : महाराष्ट्र – छत्तीसगड सीमावर्ती भागात शौर्यपूर्ण अभियान राबवत गडचिरोली पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) ने शुक्रवार २३ मे २०२५ रोजी चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घातले. यात एक दलम कमांडर दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह तीन दलम सदस्य पदावरील माओवाद्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे १४ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये यात सन्नू मासा पुंगाटी ( वय ३५) रा. कवंडे, ता. भामरागड, जि. गडचिरोली, अशोक ऊर्फ सुरेश पोरीया वड्डे ( वय ३८) , रा. कवंडे, ता. भामरागड, जि. गडचिरोली, विज्यो ऊर्फ विज्यो होयामी (वय २५), रा. पोडीया, गंगालूर एरीया (छत्तीसगड), करुणा ऊर्फ ममीता ऊर्फ तुनी पांडू वरसे ( वय २१) रा. गोंगवाडा, ता. भामरागड, जि. गडचिरोली, यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवर भामरागड उपविभागाअंतर्गत नुकत्याच नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कवंडे पोलिस स्टेशनच्या हद्दीत विध्वंसक कारवाया करून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने काही माओवादी एकत्र येऊन दबा धरून बसले आहेत, अशा गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून वरीष्ठांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस दलातील विशेष अभियान पथकाच्या १२ तुकड्या व सीआरपीएफ ११३ बटालियन डी कंपनीची १ तुकडी तातडीने गुरुवार (ता. २२)दुपारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदीच्या काठावरील परिसरात माओवादविरोधी अभियान राबवण्यासाठी रवाना करण्यात आली होती.या अवघड जंगल परिसर व प्रतिकूल हवामानाचा सामना करत जंगल परिसरात पोहचून शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पोलिस पथकातील जवान या जंगल परिसरात घेराबंदी करून शोध अभियान राबवत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. सुमारे दोन तास चाललेल्या चकमकीनंतर या जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळावर २ पुरुष व २ महिला अशा एकूण ४ माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. यातील सन्नू पुंगाटी भामरागड दलम कमांडर होता. त्याच्यावर १ चकमक, १ खून, इतर एक अशा एकूण ३ गुन्ह्यांची नोंद आहे. अशोक वड्डे भामरागड दलम सदस्य होता. त्याचा ६ चकमकी, १ जाळपोळ, ५ खून, इतर ५ अशा एकूण १७ गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. विज्यो होयामी भामरागड दलम सदस्य होती. तिचा ६ चकमकी, ५ खून, १ इतर अशा १२ गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. करुणा वरसेसुद्धा भामरागड दलम सदस्य होती. तिचा ४ चकमकी, २ खून, इतर ३ अशा एकून ९ गुन्ह्यांत सहभाग होता. पोलिसांना घटनास्थळी एक एस.एल.आर., दोन ३०३ रायफल व एक भरमार बंदुक, वॉकीटॉकी, माओवादी साहित्य व इतर दैनंदिन वापराचे साहित्य आढळले. हे माओवादविरोधी अभियान अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, कमांडंट ११३ बटालियन सीआरपीएफ जसवीर सिंह यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० आणि सीआरपीएफ ११३ बटालियन डी कंपनीच्या जवानांनी पार पाडले. सन २०२१ पासून गेल्या चार वर्षांत गडचिरोली पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ८७ जहाल माओवाद्यांना कंठस्नान, तर १२४ माओवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे. तसेच ६३ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. या खडतर अभियानादरम्यान सी-६० व सीआरपीएफच्या जवानांनी दाखविलेल्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे. तसेच या भागात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून पून्हा एकदा सर्व माओवाद्यांना शरणागती पत्करून आपले जीवनमान उंचावण्याचे आवाहन केले आहे.