जागतिक सायकलदिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने सायकल रॅली

69

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता.३ : संयुक्त राष्ट्रसंघाने सन – २०१९ पासून ३ जून हा दिवस जागतिक सायकलदिन म्हणून घोषित केलेला आहे. तेव्हापासून ३ जून हा दिवस जागतिक सायकलदिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. या अनुषंगाने गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

सायकल ही साधी, परवडणारी, विश्वासार्ह, स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल असे शाश्वत वाहतुकीचे साधन आहे. तसेच नेहमीच सायकल चालविणे शरीर स्वास्थासाठी फायदेशिर आहे. लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करण्यासाठी व अधिकाधिक लोकांनी सायकलीचा वापर करावा यासाठी दरवर्षी जागतिक सायकलदिन साजरा केला जातो. ३ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजता पोलिस कवायत मैदान ते इंदिरा गांधी चौकपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या सायकल रॅलीमध्ये पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन/अभियान) एम. रमेश तसेच पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व पोलिस अधिकारी/अंमलदार, ज्येष्ठ नागरिक, युवक/युवती आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सायकल रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला व शेवटी या सायकल रॅलीचा शहीद पांडू आलाम सभागृह येथे समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व सहभागी सायकलस्वारांना पोलिस दलाकडून सहभागी प्रमाणपत्र दिले.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, सायकल चालविल्यामुळे आपले आरोग्य सुधारते आणि पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात संरक्षण होते. आठवड्यातून किमान दोन दिवस जरी एक तास सायकल चालवली तरी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते तसेच आपल्या शारीरिक तंदुरुस्तीबाबत आपल्याला जाणीव होते. तसेच यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आपल्या निरोगी जीवनासाठी सर्वांना सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहीत करून सायकलचा वापर करण्याबाबत आवाहन करून जागतिक सायकलदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम संपल्यावर सर्व सहभागींना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन/अभियान) एम. रमेश तसेच पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नागरी कृती शाखेचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके व सर्व पोलिस अंमलदार तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदारांनी सहकार्य केले. सायकल रॅलीमध्ये ३००हून अधिक पोलिस अधिकारी / अंमलदार, ज्येष्ठ नागरिक, युवक / युवती व विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग होता.

—————————————