ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २६ : गडचिरोली शहरात मागील आठवड्यात चामोर्शी रोड, धानोरा रोड, चंद्रपूर रोडवरील व्यापारी दुकानांचे शटर लॉक तोडून चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीला गडचिरोली पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांनी गुरुवार (ता.२६) अटक केली.
सविस्तर वृत्तानुसार गडचिरोली पोलिस स्टेशन येथे १९ जून २०२५ रोजी शहरातील विविध ठिकाणी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस स्टेशनच्या डिटेक्शन स्टाफचे अधिकारी व अंमलदारांनी शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून रात्रगस्त वाढवून या टोळीतील आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी ४ अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले आहे. या अल्पवयीन बालकांकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अल्पवयीन आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेकरिता गडचिरोलीतील बाल न्यायमंडळासमोर हजर केले जाण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. ही कारवाई बाल कल्याण पोलिस अधिकारी, पोलीस स्टेशन, गडचिरोलीमार्फत होणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार दिलीप खोब्रागडे करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान),एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, डिटेक्शन पथकातील पोलीस अंमलदार धनंजय चौधरी, स्वप्निल कुडावले, स्वदीप मेश्राम, तुषार खोब्राागडे, अतुल भैसारे यांनी पार पाडली. मात्र या अल्पवयीन मुलांनी शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या दुकानांचे कुलूप तोडून एवढी धाडसी चोरी कशी केली, त्यांच्या मागे कोणी मास्टरमाइंड आहे का किंवा या अल्पवयीन मुलांची काही मजबुरी होती का, असे अनेक प्रश्न जनतेला पडत आहेत. एकूणच अल्पवयीन मुलांना अशा चोरीच्या प्रकरणात अटक होणे समाजमन सुन्न करणारे आहे.










