ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १ : तालुक्यातील कुरखेडा हद्दीतील सती नदीवरील पुलाजवळ तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्तातील पोलिस अधिकारी व अंमलदारांनी समयसुचकता दाखवून नदीतील प्रवाहासोबत वाहून जाणाऱ्या नागरिकास बुडण्यापासून वाचवले. अजय बाळकृष्ण रामटेके ( वय ४०) रा. श्रीरामनगर, ता. कुरखेडा, असे या व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे सती नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. तसेच नदीवरील मुख्य पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पुलाशेजारी तात्पूरत्या स्वरुपात पुल बांधण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने २९ जूनपासून सती नदीवरील पुलाच्या ठिकाणी कुरखेडा पोलिस स्टेशन येथील पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ३० जून रोजी या पुलावरून अजय रामटेके त्यांच्या दूचाकी वाहनाने प्रवास करत असताना नदीच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दूचाकीसह नदीच्या प्रवाहासोबत वाहून जात होते. याच वेळी या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात तैनात असलेले पोलिस उपनिरीक्षक दयानंद भोंबे, सहायक फौजदार शालिक मेश्राम, पोलिस हवालदार श्याम शेणकपट यांनी समयसुचकता दाखवत तत्परतेने दोरीच्या सहाय्याने अजय रामटेके यांना पाण्याच्या प्रवाहातून सुखरुपपणे बाहेर काढून तत्काळ कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक, अहेरी सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक गोकुळ राज जी. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक दयानंद भोंबे, सहायक फौजदार शालिक मेश्राम व पोलिस हवालदार श्याम शेणकपट यांनी केली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अशा पुर परिस्थितीच्या वेळी सतर्कतेने सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.










