ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ४ : जिल्ह्यातील नागरिकांचे हरवलेले व चोरीला गेलेले ७२ मोबाईल शोधून काढण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते हे मोबाईल नागरिकांना सुपुर्द करण्यात आले.
मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास अशा मोबाईलद्वारे सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे हरवला किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक असते. या बाबींचा विचार करून सायबर पोलिस स्टेशनमार्फत तांत्रिक कौशल्याचा वापर करून हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येत असतो. मागील वर्षी सन २०२४ मध्ये एकूण ११९ मोबाईलचा शोध घेण्यात आला असून त्यांची अंदाजे किंमत एकुण १९ लाख ३१ हाजर ९१२ रुपये एवढी होती. तसेच सप्टेंबर २०२४ ते डिसेंबर २०२४ या चार महिन्यांच्या कालावधीत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या ५३ मोबाईलचा शोध घेऊन ७ जानेवारी २०२५ रोजी शोधण्यात आलेल्या मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले होते. यासोबतच जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत हरवलेल्या व चोरीस गेलेल्या एकुण ११ लाख ११ हजार ६०० रुपये किंमतीच्या ७२ मोबाईलचा गडचिरोली पोलिस दलामार्फत शोध घेण्यात आलेला असून शुक्रवार (ता. ४) सर्व मोबाईल संबंधित तक्रारदारांना पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. सन २०२५ या वर्षात आतापर्यंत सायबर पोलिस ठाण्याकडून अंदाजे १९ लाख ६७ हजार १६१ रुपये किंमतीच्या एकूण १२५ मोबाईल फोनचा शोध घेण्यात आला असून ते संबंधित तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले आहेत. कार्यक्रम प्रसंगी पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, सध्या सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत असुन, सायबर गुन्हेगारांमार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून फसवणुक केली जात आहे. मोबाईल चोरी झाला असेल तर तात्काळ ceir.gov.in या पोर्टलवर आपण तक्रार नोंदवावी. तसेच मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलिसांवर विश्वास ठेवून तात्काळ जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. जेणेकरुन आपला हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल आपल्याला परत मिळू शकतो. तसेच अज्ञातांकडून आपल्या मोबाईलचा गैरवापर केला गेल्यास आपण सुरक्षित राहतो, असेही ते म्हणाले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक व अपर पोलिस अधीक्षक गोकुळ राज जी. यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलिस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, महिला पोलिस उपनिरीक्षक नेहा हांडे, महिला पोलिस हवालदार वर्षा बहिरवार, पोलिस अंमलदार संजिव लेंडगुरे, दिवाकर तनमनवार, भूषण गलगट, राहुल शिवरकर, प्रणय नाकाडे, अंकुश बोधनकर यांनी पार पाडली.
————————————-










