वनविकास महामंडळाच्या कॉलनीत वन्यप्राण्याचे मांस शिजले मांस, पाच आरोपी अटकेत

101

अहेरी, ता. १० : वन्यप्राण्याची शिकार करून मांस शिजविताना एकाला रंगेहात अटक केल्याची घटना नागेपल्ली येथील वनविकास महामंडळाच्या कॉलनीत बुधवार (ता. ९) सायंकाळच्या सुमारास घडली. तसेच इतर चार आरोपींनाही अटक केली आहे. ही कारवाई अहेरी वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे. या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एफडीसीएम कॉलनीत काहीजण वन्यप्राण्याचे मांस शिजवत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे वनविभागाने पथक तयार करून तत्काळ एफडीसीएम कॉलनीत धाड टाकली असता मटण शिजवत असल्याचे दिसून आले. वनविभागाच्या पथकाने मांस आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गुरुवार (ता. १०ः वनविभागाने आणखी चार जणांना ताब्यात घेतले आहे.शिजलेले मांस हरीण या वन्यप्राण्यांचे असल्याची माहिती पुढे येत असली तरी वनविभाग पुढील तपास करत आहे. विशेष म्हणजे वन्यप्राण्यांची शिकार कुठे आणि कशी करण्यात आली. सोबतच वन्यप्राणी शिकार प्रकरणात वनविकास महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी तर गुंतलेले नाही ना ? आणि या वन्यप्राण्यांचे इतर अवयव कुठे ठेवण्यात आले, ही सर्व माहिती वनविभागाच्या चौकशीत पुढे येणार आहे. विशेष म्हणजे आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक म्हणून दिपाली वनकर (तलमले) यांनी नुकताच पदभार हाती घेतला आहे. या संपूर्ण घटनेची योग्य चौकशी करून या प्रकरणात गुंतलेल्या आरोपींना अटक करून कुठली शिक्षा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

————————–