चितळ शिकारीच्या प्रकरणा पाठोपाठ नीलगाईची शिकारही उघड

117

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. १० : नागेपल्ली येथील एफडीसीएम कॉलनीत चितळाचे मांस शिजवताना ९ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने धाड टाकून एका आरोपीला रंगेहात अटक केली आहे. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार या घटनेत आणखी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही घटना ताजी असतानाच आलापल्ली वनविभागात आणखी एक वन्यप्राण्याची शिकारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्राप्त माहितीनुसार आष्टी ते आलापल्ली ३५३- सी या राष्ट्रीय महामार्गावर लगाम परिसरात ८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अहेरी पोलिस गस्तीवर असताना शांतीग्राम आणि बोरी दरम्यान दोघेजण दुचाकीवर पोत्यात काहीतरी बांधून घेऊन जाताना आढळले. पोलिसांना संशय येताच त्यांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग केला. मात्र, दुचाकीस्वाराला पोलिस आपला पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच पोती रस्त्यावर फेकून अंधाराचा फायदा घेत एकजण शेतशिवारात पसार झाला तर दुसरा दुचाकी घेऊन धूम ठोकला.पोलिसांनी ही दोन पोती उघडून तपासले असता पोत्यात नीलगायचे अवयव आढळून आले. विशेष म्हणजे एका पोत्यात शिंगं असलेले डोके आणि दुसऱ्या पोत्यात दोन पाय आढळले. लगेच अहेरीचे पोलिस उपनिरीक्षक चैतन्य घावटे यांनी याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठत मोका पंचनामा केला. निलगायच्या अवयवांची तपासणी करून पशुधन विकास अधिकारी डॉ. चेतन अलोने यांनी वनविभागाला मृत्य प्रमाणपत्र दिले. तर अवयव प्रादेशिक न्याय वैद्यक विज्ञान प्रयोगशाळा, नागपूर येथे फॉरेन्सिक रिपोर्टकरीता पाठविण्यात आले.विशेष म्हणजे अहेरी वनपरिक्षेत्रातील लगाम उपक्षेत्रात ८ जुलै रोजी निलगाय आणि अहेरी उपक्षेत्रात ९ जुलै रोजी चितळ असे दोन वन्यप्राण्यांची शिकार झाली आहे. लागोपाठ उघडकीस आलेल्या दोन्ही घटनामुळे या परिसरात वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. लगाम उपक्षेत्रातील नीलगाय शिकार प्रकरणातील आरोपी पसार झाले असले तरी नागेपल्ली येथील चितळ शिकार प्रकरणातील आरोपींना घेऊन वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळ गाठले आहे. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आलपल्लीचे उपविभागीय वन अधिकारी शिशुपाल पवार करीत आहेत. आलापल्ली वनविभागात हिरवगार आणि मौल्यवान जंगल आहे. या जंगलात विविध प्रकारचे आणि मौल्यवान जंगल आहे. या जंगलात विविध प्रकारचे वन्यप्राणी आढळतात. मात्र वन्यप्राण्यांचे होत असलेले शिकार ही गंभीर बाब असून वन्यप्राण्यांचे शिकार रोखण्याचे आव्हान आता आलापल्ली वनविभागासमोर राहणार आहे.

————————————