ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २४ : पोलिस दलाकडून जिल्ह्यातील
नागरिकांसाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांतील नागरिकांपर्यंतदेखील आरोग्यसेवा पोहचविण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाकडून विविध आरोग्य मेळावे आयोजित केले जात असतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने वडसा पोलिस स्टेशन येथे गडचिरोली पोलिस दल, रोटरी क्लब नागपूर, तालुका आरोग्य विभाग, देसाईगंज आणि राज्य राखीव पोलीस बल यांच्या संयुक्त विद्यमाने आज २४ ऑगस्ट २०२५ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पावसाळ्यामध्ये बदलत असलेल्या हवामानामूळे तसेच दूषित अन्न व जेवणामूळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण अधिक असते. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करून नागरिकांना विविध आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रोटरी क्लब, नागपूरच्या प्रमुख डॉ. रश्मी शाहू, डॉ. गिरीश छाबराणी यांच्या नेतृत्वात हृदयरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ, दंत चिकित्सक, नेत्ररोग तज्ज्ञ, इतर आजारांवरील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी तसेच सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गहाणे, सहारे यांच्या उपस्थितीत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन आरमोरी विधानसभा मतदार संघाचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरादरम्यान देसाईगंज पोलिस स्टेशन व परिसरातील सुमारे ५४७ नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करून आवश्यकतेनूसार नागरिकांना औषधे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच एकूण ४१ नागरिकांना आवश्यकतेनुसार विविध रुग्णालयांच्या ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी शिफारस केली आहे, एकूण ३१ नागरिकांचे वंध्यत्व निवारणासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे शिफारस करण्यात आली आहे. यासोबतच एकूण १२५ नागरिकांची नेत्र तपासणी करून त्यांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने सन २०२१ पासून आजपर्यंत एकूण १५२ आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून एकूण ३७,७७० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच एकूण ५ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून एकूण ३,११९ युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. यासोबतच ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून एकूण ८, ४९८ पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करून एकूण १,१४४ नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शिबिराचे आयोजन पोलिस अधीक्षक नीलोत्पल, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १३ च्या समादेशक भाग्यश्री नवटाके, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., तसेच कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले, सहायक समादेशक ललित मिश्रा आणि लांबेवार यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक मनिष गोडबोले, पोलिस उपनिरीक्षक देरकर व अंमलदार तसेच राज्य राखीव पोलिस बल गट क्र १३, विसोरा येथील पोलिस निरीक्षक पवार, मोरला यांनी पार पाडले.
———————










