मुसळधार पावसात अभियान राबवून ठार केले चार माओवादी

195

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २८ : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली पोलिसांनी मुसळधार पाऊस, पूरपरीस्थिती असतानाही अत्यंत प्रतिकूल परीस्थितीत अभियान राबवत चार जहाल माओवाद्यांना ठार केले.

या चकमकीत पोलिसांनी एक पीपीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह तीन सदस्य पदावरील माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे एकूण १४ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. अतिशय प्रतिकूल हवामानादरम्यान ४८ तासांपेक्षा अधिक चाललेल्या या अभियानात घटनास्थळावरून १ एस.एल.आर., २ इन्सास व एक ३०३ रायफल जप्त करण्यात आली.महाराष्ट्र–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात विध्वंसक कारवाया करून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने गडचिरोली विभागातील माओवाद्यांच्या गट्टा दलम, कंपनी क्र. १० व इतर दलमचे काही माओवादी एकत्र येऊन दबा धरून बसले आहेत, अशा गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस दलातील विशेष अभियान पथकाच्या २० तुकड्या व सीआरपीएफ क्यू.ए.टी. च्या २ तुकड्या सोमवार (ता. २५) तातडीने या जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबवण्यासाठी रवाना करण्यात आल्या होत्या. अवघड जंगल परिसर व प्रतिकूल हवामानाचा सामना करत सतत सुरू असलेल्या पावसादरम्यान सलग दोन दिवस अभियान राबवून पोलिस पथके या जंगल परिसरात पोहचली. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी बुधवार (ता. २७) सकाळी दहा डोंगर पार करून आलेली पोलिस पथके शोध अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर या जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर १ पुरुष व ३ महिला अशा एकूण ४ माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. या चारही मृत माओवाद्यांची ओळख पटली आहे. हे माओवादविरोधी अभियान अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. श्री. छेरिंग दोरजे, विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, उप-कमांडंट सीआरपीएफ सुमित वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० आणि सीआरपीएफ क्यू.ए.टी. च्या जवानांनी पार पाडले. सन २०२१ पासून आतापर्यंत गडचिरोली पोलिसांकडून ९१ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून १२८ माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे व ७५ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. या खडतर अभियानादरम्यान सी-६० व सीआरपीएफच्या जवानांनी दाखविलेल्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि सर्व जवानांना सुखरूप परत आणण्यासाठी संपूर्ण अभियानाची देखरेख करून अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली गोकुल राज जी., पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, सी-६० प्राणहिताचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक राहुल देवडे यांच्यासह सी-६० गडचिरोली आणि प्राणहिताचे इतर अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या भागात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व माओवाद्यांना शरणागती पत्करून आपले जीवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.

 

हे आहेत ठार केलेल माओवादी….

१. नाव – मालु पदा (वय ४१), रा. बुर्गी (रेंगावाही), ता. बेटीया, जि. कांकेर (छत्तीसगड)

दलमचे नाव – कंपनी क्र. १०

पद – पीपीसीएम

बक्षिस – ६ लाख रुपये

कार्यकाळात दाखल गुन्हे – चकमक – ५, खून – १, जाळपोळ – १, इतर – १ – एकुण – ८

 

२. नाव – क्रांती ऊर्फ जमुना रैनू हलामी ( वय ३२), रा. बोधीनटोला, ता. धानोरा, जि. गडचिरोली

दलमचे नाव – कंपनी क्र. १०

पद – कंपनी सदस्य

बक्षिस – ४ लाख रुपये

कार्यकाळात दाखल गुन्हे – चकमक – १३, खून – ६, जाळपोळ – ३, इतर – ५ – एकूण – २७

 

३. नाव – ज्योती कुंजाम (वय २७), रा. बस्तर एरीया, राज्य छत्तीसगड

दलमचे नाव – अहेरी दलम

पद – दलम सदस्य

बक्षिस – २ लाख रुपये

कार्यकाळात दाखल गुन्हे – चकमक – ७, खून – १ एकूण – ८

 

4. नाव – मंगी मडकाम ( वय २२), रा. बस्तर एरीया, राज्य छत्तीसगड

दलमचे नाव – गट्टा दलम

पद – दलम सदस्य

बक्षिस – २ लाख रुपये

कार्यकाळात दाखल गुन्हे – चकमक – २, इतर – १ एकूण – ३

 

चारही माओवाद्यांवरील एकूण बक्षिस – १४ लाख रुपये

 

 

जप्त केलेली शस्त्रे…

घटनास्थळावरून एक एस.एल.आर., दोन इन्सास व एक .३०३ रायफल अशी एकूण ४ शस्त्रे, एकूण ९२ नग जिवंत काडतूस, ३ वॉकीटॉकी, माओवादी साहित्य व इतर दैनंदिन वापराचे साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे.

 

————————————————