ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २२ : महिलेला बांबूच्या काठीने मारहाण करणाऱ्या पाच आरोपींना न्यायालयाने सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सविस्तर वृत्तानुसार मुरूमगाव पोलिस स्टेशन येथे १३ मार्च २०२० रोजी पीडीतेने फिर्याद दिली होती की, सिंदेसुर ता. धानोरा, जि. गडचिरोली येथील रहिवासी लिलाबाई बिसाऊ गोटा, सोबराज अलीयारसिंग मडावी, कोलीबाई सोबराज मडावी, लालतीबाई धनीराम गावडे व रगोतीबाई सोबराज मडावी यांनी फिर्यादी दुलोबाई फत्तेसिंग धुर्वा हिला १२ मार्च २०२० रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वीजखांबाला बांधून तसेच अंगावरील वस्त्रे फाडून बांबूच्या काठीने मारहाण केली आहे. फिर्यादीच्या अशा तोंडी रिपोर्टवरून मुरूमगाव पोलिस स्टेशन येथे १३ मार्च २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी महिला पोलिस उपनिरीक्षक अंजली मेवासिंग राजपूत यांनी पाचही आरोपींना १४ मार्च २०२० रोजी अटक केली. तपास पूर्ण करुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. फिर्यादी, इतर साक्षीदारांचे बयाण व वैद्यकीय पुरावा तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून शुक्रवार (ता.१९) आरोपी लिलाबाई बिसाऊ गोटा, सोबराज अलीयारसिंग मडावी, कोलीबाई सोबराज मडावी, लालतीबाई धनीराम गावडे व रगोतीबाई सोबराज मडावी सर्व रा. सिंदेसुर ता. धानोरा, जि. गडचिरोली यांना धानोरा येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश एन. ए. पठाण यांनी दोषी ठरवून एक वर्ष सश्रम कारावास, एक वर्ष साधा कारावास, दोन महिने साधा कारावास अशी कारावासाची शिक्षा व प्रत्येकी १५ हजार प्रमाणे एकूण ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच सर्व पाचही आरोपींनी ही शिक्षा एकाचवेळेस भोगायची आहे, अशी तरतुद करण्यात आलेली आहे.सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील बी. के. खोब्राागडे यांनी कामकाज पाहिले, तसेच गुन्ह्याचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक अंजली मेवासिंग राजपुत यांनी केला. तसेच संबंधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गतीकरिता कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून धानोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सलामे व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.










