जंगलात सुरू असलेला कोंबड्यांच्या झुंजीचा जीवघेणा खेळ पोलिसांनी केला खल्लास

214

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २२ : जिल्ह्यातील रेगडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गरंजी टोला येथे पोलिसांनी रविवार (ता. २१) कोंबड बाजारावर मोठी कारवाई करत अवैधपणे कोंबड्यांचा बाजार भरवून कोंबड्यांच्या झुंजींवर जुगार खेळणाऱ्या ९२ आरोपींना ताब्यात घेत १४ कोंबडे, ५ चारचाकी, ४६ दुचाकी वाहनांसह एकूण ४४ लाख २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गरंजी टोला जंगल परिसरात धानोराचे सहायक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकातील तीन पथके माओवादविरोधी अभियान राबवित असताना गरंजी टोला जंगल परिसरात काही व्यक्तींचा मोठमोठ्याने आरडाओरड करण्याचा आवाज आल्याने पोलिस पथकातील अधिकारी व जवानांनी जवळ जाऊन याबाबत खात्री केली. त्या ठिकाणी काहीजण कोंबड्यांची झुंज लाऊन, त्यावर जुगार खेळत असल्याचे दिसून आले. याबद्दल वरिष्ठांना माहिती दिली असता वरिष्ठांच्या परवानगीने रेगडी पोलिस स्टेशन येथील पोलिस पथकाची योग्य त्या साहित्यानिशी दोन शासकीय पंचांसह कायदेशिर मदत घेऊन विशेष अभियान पथकातील अधिकारी व अंमलदार आणि रेगडी येथील पोलिस अधिकारी व अंमलदारां संयुक्तपणे धाड टाकली. या धाडी दरम्यान पोलिस आल्याची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला होता. मात्र या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरुन एकूण ९२ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील एकूण ४६ नग जुन्या वापरत्या मोटारसायकल अंदाजे एकूण किंमत १६ लाख १० हजार रुपये, एकूण ५ नग जुने वापरते चारचाकी वाहन एकूण किंमत २६ लाख, एकूण ३१ जुने वापरते मोबाईल फोन अंदाजे एकूण किंमत १ लाख ७० हजार, एकूण १४ नग कोंबडे अंदाजे एकूण किंमत ३ हजार २००, ५ नग लोखंडी काती अंदाजे एकूण किंमत २५० रुपये तसेच एकूण ४२, ९५० रुपये रोख रक्कम अशा वर्णनाचा एकूण ४४ लाख २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. यावरून संबंधीत घटनेच्या अनुषंगाने नमूद ९२ आरोपींवर रेगडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास रेगडी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक कुणाल इंगळे करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे व विशेष अभियान पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास बागल, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक देवाजी कोवासे व अंमलदारांनी पार पाडली.

———————–