ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २२ : राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदके प्राप्त करून जिल्ह्याचा मान उंचावणाऱ्या खेळाडूंना आमदार अभिजित गोविंदराव वंजारी (विधान परिषद सदस्य तथा अध्यक्ष, गोविंदराव वंजारी फाउंडेशन) यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार अभिजित वंजारी यांनी खेळाडूंना प्रोत्साहनपर संदेश देत सांगितले की, खेळाडूंचे यश हे केवळ वैयक्तिक नसून समाज व राज्याच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरते. ग्रामीण भागातील खेळाडूंनी मेहनत आणि शिस्तीच्या बळावर आज मोठी कामगिरी करून दाखवली आहे. फाउंडेशनतर्फे नेहमीच अशा गुणवंतांना प्रोत्साहन दिले जाईल. विशेष आभार प्रशिक्षक अनिल निकोडे यांचे केले. एखादा खेळाडू घडवणे ही केवळ एक जबाबदारी नसून ते एक मोठं आव्हान असतं. खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच त्यांची मानसिक ताकद, शिस्त, नियमितता आणि जिद्द तयार करणे हे काम प्रशिक्षकाचे असते. मैदानावर यश मिळवताना लोकांच्या टाळ्या मिळतात, पण त्या यशामागे प्रशिक्षकाची न थकता केलेली मेहनत, संयम आणि मार्गदर्शन दडलेले असते. म्हणूनच खऱ्या अर्थाने खेळाडू घडवण्याचे कठीण पण प्रेरणादायी काम हे प्रशिक्षकालाच माहिती असते. महाराष्ट्रातील सर्वात पहिले वनहक्क पारित करणारे कायदा तयार करणारे प्रणेते देवाजी तोफा यांनी राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करून त्यांचे मनापासून स्वागत केले. या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त वर्षा प्रवीण मोडक, रौप्य पदक प्राप्त वसुधा विनोद बोबाटे, स्नेहा रत्नाकर वाणी रौप्य पदक आणि विशाल माधव भांडेकर रौप्य पदक यांनी जिल्ह्याचा आणि क्लब आणि योग असोशिएशनचा मान वाढवला. त्यांच्या या कामगिरीचा गौरव करताना देवाजी तोफा म्हणाले की, खेळाडूंचे यश हे समाजाच्या प्रगतीचे द्योतक असून अशा गुणवंत खेळाडूंनी पुढे जाऊन राज्य व देशाचा मान उंचवावा, यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सत्कारामुळे खेळाडूंच्या कुटुंबीयांमध्ये व चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
—————————-










