ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २२ : आजचा तरुण सशक्त असेल तरच उद्याचा समृद्ध भारत बनेल, असे प्रतिपादन आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे यांनी केले.
शालेय शिक्षण क्रीडा विभाग नागपूरतर्फे विकसित महाराष्ट्र २०४७ युवा व क्रीडा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय क्रिडा संकुल मानकापुर , नागपूर येथे करण्यात आले. यावेळी मंचावर नागपूरचे माजी आमदार कल्याण पाटील, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक संजय सबनीस, पुणे, उपसंचालक पल्लवी धात्रक , गडचिरोलीचे क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिव्या देशमुख, तसेच राज्य व राष्ट्रीय पुरस्कार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातर्फे युवांचे मानसिक आरोग्य व समुपदेशन हा विषय मांडण्यासाठी आधारविश्व फाऊंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे यांना क्रीडा विभागातर्फे आमंत्रित करण्यात आले होते.या विषयावर बोलताना गीता हिंगे म्हणाल्या की, आजचा सशक्त तरुण म्हणजे उद्याचा समृद्ध भारत हीच भविष्याची संकल्पना आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत २०४७,तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकसित महाराष्ट्र २०४७ चे स्वप्न आजचा सशक्त, जागरूक आणि कृतिशील तरुणच पूर्ण करू शकेल. परंतु आज आपण सगळीकडे बघतो आहोत की तरुण पिढीमध्ये मादक पदार्थ सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आजचा तरुण ध्येयापासून भरकटत चालला आहे. त्यांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. म्हणून आजच्या युवांसाठी मानसिक आरोग्य व समुपदेशनाची अत्यंत आवश्यकता आहे, असे म्हणून गीता हिंगे यांनी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना विनंती केली की, यासाठी समुपदेशनाचे केंद्र प्रत्येक तालुक्यात उघडण्यात यावे. कारण आजच्या काळात देशाची खरी ताकद त्यांच्या युवाशक्तीत आहे. नागपूर विभागीय चर्चासत्रात सर्वात आधी बोलण्याची व विचार मांडण्याची सर्वात आधी संधी गीता हिंगे यांना देण्यात आली, आणि गीता हिंगे यांनी तरुण पिढीसाठी योग्य वैचारिक परिवर्तनासाठी आवश्यक असलेल्या उपायाचे विश्लेषण केले, फक्त चर्चा न करता त्यासाठी आवश्यक नियोजनावरसुद्धा आपल्या वक्तव्यात प्रकाश टाकला. इतका महत्त्वाचा असलेला विषय मांडण्याची संधी दिल्याबद्दल गीता हिंगे यांनी आयोजकांचे आभार मानले. संचालन माया दुबळे यांनी केले.










