ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २४ : आपल्या देशाला बाजारपेठ समजून व्यापारी कंपन्या सर्वसामान्यांना लुटत आहेत. सरकार बळीराजाकडे छोट्या रकमेच्या कर्जासाठी तगादा लावते. पण मोठ्या कंपन्यांचे कोट्यवधींचे कर्ज सरसकट माफ करते, त्यांना शेकडो एकर जमिन उद्योगासाठी देते. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहे. सरकार शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांपेक्षा उद्योजकांचेच हित जपत आहे, अशी टीका प्रहार संघटनेचे संस्थापक तसेच शेतकरी नेते बच्चू कडू यांनी गडचिरोली येथे बुधवार (ता. २४) पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परीषदेत बच्चू कडू म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे. पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षापासून आधारभूत मूल्याच्या नावाखाली फसवणूक होत आहे. एकंदरीत विचार केल्यास येथील धान उत्पादक शेतकरी दरवर्षी हेक्टरी १६ हजाराचा तोटा सहन करतो. मात्र राज्य सरकार याकडे लक्ष देत नाही. पण व्यापारी कंपन्यांना भरघोस मदत केली जात आहे. शेतकरी कर्ज माफ करायची वेळ येते तेव्हा तिजोरीत खडखडाट आहे सांगणाऱ्या सरकारकडून देशातील उद्योगपतींचे १७ लाख कोटींचे कर्ज माफ करण्यात आले आहे. रिलायन्ससारख्या कंपनीवरील ४८ हजार कोटीच्या कर्जाचा यात समावेश आहे. हे उद्योगपती देशातील सर्वसामान्य जनतेला लुटण्याचे काम करत आहे आणि नेत्यांचे खिसे भरत आहे. देशात निर्माण झालेल्या समस्यांवर प्रश्न विचारू नये म्हणून सर्वसामान्य जनतेला धर्म व जातीच्या भांडणात गुंतवणूक ठेवून सत्ताधारी आपले हित साधत आहे.नुकतेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदिवासींच्या जमिनी भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात कायदा बनवण्यात येणार असल्याचे सांगितले. यावरून आदिवासींमध्ये तीव्र असून रोष आहे. ही व्यवस्था कुणासाठी? हे कळायलाच हवे. गडचिरोलीत मोठे उद्योग उभारण्यात येत आहेत. मात्र, यात किती स्थानिकांना रोजगार मिळाला हे देखील तपासणे गरजेचे आहे. खासगी कंपन्यांसाठी नियम, कायद्यांना बगल दिली जाते, पण गरीब शेतकऱ्यांना याच कायद्याचा धाक दाखवला जातो. हे सरकार तर इंग्रजांपेक्षा अधिक जुलमी आहे. यांच्यापेक्षा इंग्रजच बरे होते, असेही ते म्हणाले. राज्याचा दौरा करून त्यांचे प्रश्न समजून घेत भविष्यात आम्ही एक नवी चळवळ उभी करणार आहोत. आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान गडचिरोली ते नागपूर पदयात्रा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. शेतातील उभे पीक हत्ती नष्ट करत आहेत. सर्वसामान्य नागरिक जंगलात गेले की त्यांना वनकायद्याचा धाक दाखवण्यात येतो. मग रानटी हत्ती आमच्या शेतात येत असतील तर त्यांना तिथे येऊ न देण्याचे काम कुणाचे आहे. हत्तीसारखा प्राणी वनविभाग थांबवू शकत नसेल, तर हा विभाग आहे कशासाठी? नुकसान झाले की सरकार तुटपूंजी भरपाई देऊन बोळवण करते. ही नुकसान भरपाई नाही सरकार भीक देत आहे. आमचे नुकसान रानटी हत्ती करत असतील तर दामदुप्पट मोबदला सरकारने दिला पाहिजे आणि वनविभागालाही वठणीवर आणले पाहिजे, असेही बच्चू कडू पत्रकार परीषदेत म्हणाले.
—————————–










