ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. : राज्याच्या पोलिस महासंचलाक रश्मी शुक्ला यांच्यापुढे बुधवार (ता. २४) जहाल माओवादी डिव्हीसीएम भिमन्ना ऊर्फ व्यंकटेश ऊर्फ सुखलाल मुत्तय्या कुळमेथे आणि त्याची पत्नी डिव्हीसीएम विमलक्का सडमेक हिच्यासह एक कमांडर, दोन पीपीसीएम व एक एसीएम पदावरील एकूण ६ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे एकूण ६२ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. श्री. छेरिंग दोरजे यांचा गडचिरोली जिल्हा दौरा बुधवारी पार पडला. आजपर्यंत एकूण ७१६ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. बुधवारी सहा वरिष्ठ जहाल माओवादी भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे (डिव्हीसीएम, उत्तर बस्तर डिव्हीजन मास टिम) (वय ५८) रा. करंचा ता. अहेरी, जि. गडचिरोली, विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक, (डिव्हीसीएम, माड डिव्हीजन, डीके प्रेस टिम इंचार्ज), ( वय ५६) रा. मांड्रा, ता. अहेरी, जि. गडचिरोली, कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी, (कमांडर, पश्चिम ब्युरो टेलर टिम), (वय ३४) रा. पडतानपल्ली, ता. भामरागड, जि. गडचिरोली, नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी (पीपीसीएम, कंपनी क्र.१०),(वय ३९) रा. पामरा, ता. भैरामगड, जि. बीजापूर (छ.ग.), समीर आयतू पोटाम, (पीपीसीएम, दक्षिण ब्युरो टेक्नीकल टिम),(वय २४), रा. पुसणार, ता. गंगालूर, जि. बीजापूर (छ.ग.), नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी, (एसीएम, अहेरी दलम),(वय २८)रा. नैनेर, ता. अहेरी, जि. गडचिरोली यांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे.
विशेष म्हणजे याच वर्षी १ जानेवारी २०२५ रोजी दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटीची सदस्य ताराक्का सिडाम हिच्यासह एकूण ११ जहाल माओवाद्यांनी तसेच ६ जून २०२५ रोजी डिव्हीसीएम सपनाक्का बुचय्या चौधरीसह एकुण १२ जहाल माओवाद्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केल्याने गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला होता.
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या भेटीदरम्यान पोलिस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे आयोजित कार्यक्रमात कवंडे जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये १ दलम कमांडरसह एकूण ४ कट्टर माओवाद्यांना २७ ऑगस्ट २०२५ रोजी कोपर्शी-फुलनार जंगल परिसरात १ पीपीसीएमसह एकूण ४ माओवाद्यांना तसेच १७ सप्टेंबर २०२५ रोजी मोडस्के जंगल परिसरात १ कमांडरसह २ जहाल महिला माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवलेल्या तिनही अभियानात सहभागी विशेष अभियान पथकातील अधिकारी व जवानांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 
यासोबतच कवंडे आणि कोपर्शी-फुलनार चकमकीचे नेतृत्व करणारे अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश आणि मोडस्के चकमकीचे नेतृत्व करणारे अपर पोलिस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यासोबतच कापेवंचा येथील रावजी चिन्ना आत्राम, कियर येथील सुखराम महागु मडावी यांची माओवाद्यांनी पोलीसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन हत्या केली होती. या दोन्ही मृत नागरिकांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरणदेखील करण्यात आले. यावेळी पोलिस महासंचालक शुक्ला यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सी-६० चे अधिकारी व जवान यांच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल कौतुक केले. तसेच उर्वरीत माओवाद्यांना हिंसेचा त्याग करून आपली शस्त्रे खाली ठेवून सन्मानाचे जीवन जगण्यासाठी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामिल होत शांततेचा मार्ग स्वीकारावा,असे आवाहन केले. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या अति-संवेदनशील कवंडे पोलिस स्टेशनला भेट देऊन जवानांच्या अभियानाच्या तयारीची पाहणी केली. तसेच गडचिरोली पोलिस, सीआरपीएफ, एसआरपीएफ व सी-६० जवानांसोबत संवाद साधला व अशा प्रतिकुल अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिस स्टेशन स्थापना व त्याच्या संरक्षणाबद्दल केलेल्या प्रयत्नांसाठी जवानांची प्रशंसा केली. या विविध कार्यक्रमांप्रसंगी अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. श्री. छेरिंग दोरजे, विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान), नागपूर संदीप पाटील, सीआरपीएफचे उप महानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश , अपर पोलिस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक व अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सीआरपीएफचे उप-कमांडंट सुमित वर्मा, सहायक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे, पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे उपस्थित होते. आत्मसमर्पण केलेला भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे जुलै १९९२ मध्ये अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन विविध पदांवर काम करत २०२० मध्ये उत्तर बस्तर डिव्हिजन मास (मोबाईल अकॅडमी स्कुल) टीममध्ये बदली होऊन डिव्हीसीएम पदावर आजपर्यंत काम केले. त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २ गुन्हे दाखल असून त्यामध्ये २ खुनाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्यांची पडताळणी सुरू आहे. विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक १९९० मध्ये मांड्रा रेंज कमिटी मधील केएएमएस (क्रांतीकारी आदिवासी महिला संघटन) मध्ये अध्यक्ष पदावर होती. विविध पदांवर कार्य करताना जुलै २०१४ मध्ये माड डिव्हीजनमधील प्रेस टिममध्ये बदली होऊन डिके प्रेस टिम इंचार्ज व डिव्हीसीएम पदावर राहून आजपर्यंत काम केले.हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरू आहे. कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी डिसेंबर २०१० मध्ये पेरमीली दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली. २०२२ मध्ये पश्चिम ब्युरो टेलर टीम कमांडर पदावर पदोन्नती होऊन आजपर्यंत त्याच पदावर काम करत होती.गडचिरोली जिल्ह्यामध्ये तिच्यावर एकूण ३ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १ चकमक व २ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्यांची पडताळणी सुरु आहे. नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी जुलै २००७ मध्ये मिरतुल दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला. २०२१ मध्ये कंपनी क्र. १० मध्ये बदली होऊन पीपीसीएम पदावर आजपर्यंत काम केले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकूण ९ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ४ चकमक, १ जाळपोळ व ४ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्यांची पडताळणी सुरू आहे.समीर आयतू पोटाम डिसेंबर २०१८ मध्ये गंगालूर दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला. फेब्रुवारी २०-२५ मध्ये पीपीसीएम पदावर पदोन्नती होऊन आजपर्यंत काम केले. हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरू आहे. नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी जुलै २०११ मध्ये अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली होती. डिसेंबर २०२४ मध्ये अहेरी दलममध्ये बदली होऊन आजपर्यंत एसीएम पदावर काम केले. गडचिरोली जिल्ह्यात तिच्यावर एकूण ११ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ८ चकमक व ३ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्यांची पडताळणी सुरू आहे.
——————————————-










