मोबाईल टाॅवरची बॅटरी चोरणारे अखेर झाले जेरबंद

160

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ७ : जिल्ह्यात चक्क मोबाईल बॅटरी चोरणाऱ्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला होता. पण गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने वेगवान कारवाई करत या चोरांना जेरबंद केले. पोलिसांनी एकूण ९ गुन्हे उघडकीस आणले असून चारचाकी वाहनासह ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहेरी, ताडगाव पोलिस स्टेशन व पेरमिली, राजाराम (खां) उप पोलिस स्टेशन व येमली, बुर्गी पोलिस मदत केंद्रासह चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिस स्टेशन येथे दाखल एकूण ९ गुन्हे उघडकीस आणले. गडचिरोली पोलिस दलाच्या संरक्षणाखाली जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही काळापासून मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यावरून कौशल्यपूर्ण तपास करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणांहून मोबाईल टॉवर बॅटरी चोरी करणा­ऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील भागातील कांदोली, गुरज्या, येमली, राजाराम खांदला, तलवाडा, ताडगाव, वेदमपल्ली गावांतील वाढत्या मोबाईल टॉवर बॅट­री चोरीच्या घटना लक्षात घेता, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सतत १५ दिवस संवेदनशील भागात पाळत ठेवली. दरम्यान एक पीकअप वाहन रात्रीच्या वेळी टॉवर असलेल्या गावात संशयीतरीत्या फिरत असल्याचे दिसले. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय बातमीदारांमार्फत हे वाहन ताब्यात असणारा गोविंद खंडेलवार ( वय १९) रा. आलापल्ली जि. गडचिरोली याचा शोध घेऊन त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता हे वाहनदेखील चोरीचे असून या वाहनाचा वापर करून गोविंद खंडेलवार हा उमेश मनोहर इंगोले (वय ३८) रा. नेहरूनगर, गडचिरोली व इतर दोन साथीदारांच्या मदतीने या गावांतील मोबाईल टॉवरच्या बॅटरींची चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी चोरी केलेल्या बॅट­री अहेरी येथीत तिरुपती व्यंकया दासरी ( वय ३८) रा. अहेरी, जि. गडचिरोली याला विकल्याचे सांगितले व व्यंकया दासरी यांने या बॅटरी कागजनगर येथील याकुब शेख याला विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. चोरी केलेल्या बॅट­रीची व साहित्यांची आरोपींनी विल्हेवाट लावली असल्याचे निष्पन्न झाले. बॅटरी विक्री करून आरोपींनी मिळविलेली रोख रक्कम २ लाख रुपये, चोरी गेलेल्या बॅट­रींचे इतर साहित्य, चारचाकी पिकअप वाहन किंमत अंदाजे ३ लाख रुपये असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासादरम्यान अहेरी पोलिस स्टेशन येथील २ गुन्हे, पेरमिली उप पोलिस स्टेशन येथील २ गुन्हे, येमली बुर्गी पोलिस स्टेशन येथील २ गुन्हे, ताडगाव पोलिस स्टेशन येथील १ गुन्हा, राजाराम (खां.) येथील १ गुन्हा असे एकूण मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे ८ गुन्हे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिस स्टेशन येथील वाहन चोरीचा १ गुन्हा असे एकूण ९ गुन्हे तपासादरम्यान उघडकीस आले आहेत. हे आरोपी सध्या येमली बुर्गी येथील पोलिस स्टेशन येथे गुन्ह्यात अटकेत असून सर्व गुन्ह्यांचा तपास गडचिरोली पोलीसांकडून केला जात आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधीरा, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंग दुलत, पोलिस उपनिरीक्षक विकास चव्हाण, इंगोले, पोलिस हवालदार सतीश कत्तीवार, पोलिस अंमलदार राजू पंचफुलीवार, शिवप्रसाद करमे, श्रीकांत बोईना, धनंजय चौधरी, दीपक लोणारे, गणेश वाकडोतपवार, सुजाता ठोंबरे यांनी केली.

—————————-