अहेरीतील मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भाजपचा चक्काजाम

118

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

अहेरी, ता. ७ : येथील मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे भिजत घोंगडे पडले असून दोन वर्षे उलटूनही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे अखेर सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रस्त्याच्या दुरुस्ती रखडण्याला माजी कॅबिनेट मंत्रीच जबाबदार असल्याचा आरोप करत चक्काजाम आंदोलन केले.

अहेरी विधानसभा क्षेत्राचे मुख्यालय तथा राजनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहेरीच्या मुख्य रस्त्याची सुमारे पाच वर्षांपासून प्रचंड दुरावस्था झाली होती. बर्‍याच प्रतीक्षेनंतर दोन वर्षांपुर्वी तत्कालीन कॅबीनेट मंत्र्यांनी रस्ता दुरुस्तीच्या कामाचे भूमीपूजन करून फलकाचे अनावरण केले होते. त्याचा खुप गाजावाजा देखील झाला. प्रत्यक्षात मात्र काम सुरू झाले नाही. कालांतराने त्या रस्त्याचे कंत्राट देण्यात आले. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू होते. दोन दिवस काम प्रगतिपथावर असल्याचे दर्शवून अगदी थोडेसेच काम करून महिने, दोन महीने खंड पडायचा. पुढे काम सुरू होईपर्यंत पूर्वी केलेले कामदेखील मातीमोल व्हायचे. दोन वर्षात त्याच दुरुस्तीकामाचे पुन्हा पुन्हा भूमिपुजन झाले. परंतू काम निम्मेदेखील झाले नाही. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाढते अपघात आणि धुळीच्या प्रचंड त्रासाने नागरीक बेजार झाले आहेत. आठवड्यापूर्वी भाजपच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय गाठुन तत्काळ काम सुरू करून लवकरात लवकर पुर्णत्वास न्यावे, अशी मागणी केली. काम तत्काळ सुरू न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आठवडा लोटत असुनही सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे काहीच हालचाल होत नसल्याचे बघून भाजपचे पदाधिकारी,नगरसेवक व कार्यकर्त्यांनी अहेरीच्या मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन केले. सुमारे दीड तास आंदोलन सुरू असल्याने वाहतूक व्यवस्था खोळंबलेली होती. कार्यकारी अभियंत्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन तत्काळ काम सुरू करून तीन महिन्यातूपुर्ण होईल, असे लेखी आश्वासन दिले आणि तसे न घडल्यास पुन्हा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देऊन हे आंदोलन थांबविण्यात आले.

—————————————-