११ वरीष्ठ माओवाद्यांचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यापुढे आत्मसमर्पण

193

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १० : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यापुढे बुधवार (ता. १०) २ डीव्हीसीएम दर्जाच्या वरिष्ठ माओवाद्यांसह एकूण ११ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे यांचा गडचिरोली जिल्हा दौरा पार पडला. दरम्यान बुधवारी ११ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात रमेश ऊर्फ भिमा ऊर्फ बाजु गुड्डी लेकामी (डिव्हीसीएम- भामरागड दलम) (वय ५७), रा. एडसगोंदी ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, भिमा ऊर्फ सितू ऊर्फ किरण हिडमा कोवासी (डिव्हीसीएम/ पश्चिम बस्तर डिव्हीजन कमिटी सदस्य) ( वय ४६) रा. मौजा चिंतागुफा, ता. कोंटा, जि. सुकमा (छत्तीसगड), पोरीये ऊर्फ लक्की अडमा गोटा (पीपीसीएम/ सेक्शन कमांडर पीएलजीए बटालीयन क्र. १) ( वय ४१) रा. चेरपल्ली, ता. भोपालपट्टनम्, जि. बिजापूर (छत्तीसगड), रतन ऊर्फ सन्ना मासू ओयाम (पीपीसीएम कंपनी क्र. ७) ( वय ३२) रा. टेकलगुडा, ता. उसुर, जि. बिजापूर (छत्तीसगड), कमला ऊर्फ रागो इरिया वेलादी (पीपीसीएम कंपनी क्र. ७) ( वय ३०) रा. एडापल्ली, ता. भोपालपट्टानम्, जि. बिजापूर (छत्तीसगड), पोरीये ऊर्फ कुमारी भिमा वेलादी (एसीएम – कान्हा भोरमदेव दलम, एमएमसी झोन) ( वय ३६) रा. चेरपल्ली, ता. भोपालपट्टनम्, जि. बिजापूर (छत्तीसगड), रामजी ऊर्फ मुरा लच्छु पुंगाटी (एसीएम, कुतूल एरीया कमिटी) ( वय ३५) रा. कुमनार, ता. भामरागड, जि. गडचिरोली, सोनु पोडीयाम ऊर्फ अजय सानू कातो (सदस्य, कंपनी क्र. १ मधील प्लाटुन क्र. २) (वय २१) रा. बेतेबेडा, ता. पखांजूर, जि. कांकेर (छत्तीसगड), प्रकाश ऊर्फ पांडू कुंड्रा पुंगाटी (सदस्य, प्लाटून क्र. ३२) (वय २२)रा. गट्टेकाल, ता. ओरच्छा, जि. नारायणपूर (छत्तीसगड), सिता ऊर्फ जैनी तोंदे पल्लो (सदस्य, प्लाटून क्र. ३२) ( वय २२) रा. पदगुंडा, ता. ओरच्छा, जि. नारायणपूर (छत्तीसगड), साईनाथ शंकर मडे, (सदस्य, एओबी (आंध्रा-ओरीसा बॉर्डर) दलम) (सीसीएम उदय याचा गार्ड) ( वय २३) रा. सँड्रा, ता. भोपालपट्टनम, जि. बिजापूर (छत्तीसगड) यांचा समावेश आहे. यावेळी ४ माओवाद्यांनी माओवादी गणवेशात आपल्या शस्त्रांसह पोलिस महासंचालक शुक्ला यांच्या आत्मसमर्पण केले आहे. विशेष म्हणजे याच वर्षी १ जानेवारी २०२५ रोजी दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य ताराक्का सिडाम हिच्यासह एकूण ११ जहाल माओवाद्यांनी तसेच १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पाॅलिट ब्युरो सदस्य, केंद्रीय समिती सदस्य, प्रवक्ता-सीपीआय माओवादी तसेच सचिव-केंद्रीय रिजनल ब्युरो मल्लोजुला वेणूगोपाल राव ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आली आहे. रमेश ऊर्फ भिमा ऊर्फ बाजु गुड्डी लेकामी सन २००४ मध्ये मौजा एडसगोंदी गाव पंचायत जनताना सरकारच्या अध्यक्ष पदावर नेमणूक होऊन विविध पदांवर काम करत सन २०२१ मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन डिव्हीसीएम पदावर काम केले. त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्या एकूण ८८ गुन्हे दाखल आहेत. भिमा ऊर्फ सितू ऊर्फ किरण हिडमा कोवासी सन १९९८ मध्ये जगरगुंडा दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला होता. २०१० मध्ये जहाल माओवादी हिडमा कमांडर असताना त्याने उप-कमांडर पदावर सन २०१९ पर्यंत काम केले.पश्चिम बस्तर डिव्हीजन कमिटीमध्ये सदस्य पदावर बदली होऊन बटालीयन पार्टी कमिटीचा उप-कमांडर व प्लाटुन क्र. २ चा कमांडर म्हणून डिव्हीसीएम पदावर राहून आतापर्यंत काम केले. हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरू आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्याची पडताळणी सुरू आहे. पोरीये ऊर्फ लक्की अडमा गोटा २००३ मध्ये नॅशनल पार्क एरीयामधील सँड्रा दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली होती. २०१७ मध्ये पीएलजीए बटालीयन क्र. १ मध्ये बदली होऊन पीपीसीएम/सेक्शन कमांडरपदी पदोन्नती झाली होती. रतन ऊर्फ सन्न मासू ओयाम २०१२ मध्ये पामेड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन एक महिना काम केले. २०२३ मध्ये पीपीसीएम/एसीएम पदावर पदोन्नती होऊन कंपनी क्र. ७ मध्ये आजपावेतो काम केले. कमला ऊर्फ रागो इरिया वेलादी जुलै २००८ मध्ये सँड्रा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सप्टेंबर २००८ पर्यंत काम केले. २०१७ मध्ये पीपीसीएम/एसीएम पदावर पदोन्नती होऊन कंपनी क्र. ७ मध्ये काम करत होती.पोरीये ऊर्फ कुमारी भिमा वेलादी २००६ मध्ये नॅशनल पार्क एरीयामधील सँड्रा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २००९ पर्यंत काम केले. २०१६ मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन एमएमसी झोनमधील कान्हा भोमरदेव दलममध्ये बदली होऊन एसीएम पदावर राहून काम केले. रामजी ऊर्फ मुरा लच्छू पुंगाटी २००५ मध्ये डिकेएमएस (दंडकारण्य क्रांतिकारी मजदूर संघटन) मध्ये भरती होऊन सन २०११ पर्यंत सदस्य पदावर काम केले. २०२२ एसीएम पदावर पदोन्नती होऊन कुतूल एरीया कमिटी जनताना सरकारमध्ये उपाध्यक्ष पदावर राहून आजपर्यंत केले. सोनू पोडीयाम ऊर्फ अजय सानू कातो जून २०१७ मध्ये सीएनएम टीममध्ये सदस्य पदावर भरती होऊन ऑगस्ट २०१९ पर्यंत काम केले. सन २०२२ मध्ये कंपनी क्र. १ मधील प्लाटून क्र. २ मध्ये बदली होऊन आजपर्यंत सदस्य पदावर काम केले. प्रकाश ऊर्फ पांडू कुंड्रा पुंगाटी २०२० मध्ये प्लाटून क्र. ३२ मध्ये सदस्य पदावर भरती होऊन आतापर्यंत सदस्य पदावर काम केले.सिता ऊर्फ जैनी तोंदे पल्लो सन २०२२ मध्ये प्लाटुन क्र. ३२ मध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपर्यंत सदस्य पदावर काम केले. साईनाथ शंकर मडे २०२० मध्ये सँड्रा आरपीसी सीएनएम टीममध्ये सदस्य पदावर भरती होऊन जूलै २०२३ पर्यंत काम केले. मे २०२४ मध्ये एओबी (आंध्रा-ओरीसा बॉर्डर) झोनमधील सीसीएम उदयच्या गार्डमध्ये बदली होऊन आजपर्यंत सदस्य पदावर काम केले. महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर एकत्रिपणे ८२ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने संकलीत करण्यात आलेले ‘प्रोजेक्ट उडान- वेध विकासाचा शासकीय योजना मार्गदर्शिका’ या पुस्तकाचे अनावरण पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ.. छेरिंग दोरजे व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक, अहेरी कार्तिक मधीरा, सहायक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे तसेच पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे उपस्थित होते. गडचिरोली पोलिस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना शरणागतीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते आतापर्यंत एकूण १४६ जहाल माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे, त्यापैकी सन २०२५ मध्ये आजपर्यंत (बुधवारी शरण आलेल्या ११ माओवाद्यांसह) एकूण ११२ जहाल माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे.

——————————————-