कारमेल स्कूलच्या विद्यार्थीप्रिय शिक्षिकेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

868

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १० : येथील कारमेल स्कूलच्या शिक्षिका ममता बांबोळे यांचा ट्रकच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवार (ता. १०) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील बी- फॅशन प्लाझा जवळ घडली. या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कारमेल स्कूलमधील शिक्षिका ममता बांबोळे स्कूटीने जात असताना गाडी स्लिप होऊन त्या पडल्या आणि मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या मागील चाकात आल्याने चिरडल्या गेल्या. यात त्या जागीच ठार झाल्या. यातील सर्वांत धक्कादायक प्रकार म्हणजे अपघातानंतर घटनास्थळी शेकडो लोक जमले असतानाही कोणीही तत्काळ मदतीसाठी पुढे सरसावले नाही. ममता बांबोळे जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असताना काही साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार काही जण मोबाईलने चित्रीकरण करत होत, पण मदत करण्यासाठी एकही हात पुढे आला नाही. ममता बांबोळे या कारमेल स्कूलच्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. त्यांच्या अपघाती निधनामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेची लक्तरेही वेशीवर टांगली गेली आहे. गडचिरोली शहरातून चारही दिशांनी जाणारी जड वाहने स्थानिक इंदिरा गांधी चौकातूनच जातात. परिणामी अनेक अपघात घडत असून अनेकांचा जीव जात आहे. म्हणूनच लवकरात लवकर बायपास (आऊटर रिंग रोड) तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

———————————————